सातारा – बायोमायनिंगच्या वादग्रस्त निविदा प्रक्रियेत तांत्रिक प्राधिकारी म्हणून काम करण्यास नकार दिल्याने मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांना अन्य आठ कारणांसह नोटीस बजावण्यात आली आहे. पाटलांच्या निलंबन प्रस्तावावर घाईघाईने मुख्याधिकाऱ्यांनी सही करून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
सातारा पालिकेच्या कारभारात मुख्याधिकारी शंकर गोरे व मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते आहे. 205 कोटीच्या पंतप्रधान आवास योजनेतही भाऊसाहेब पाटील यांनी पंगा घेतला होता. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले होते. कमी अधिक फरकाने बायोमायनिंगच्या निविदा प्रक्रियेत तांत्रिक प्राधिकारी म्हणून काम करण्यास नकार दिला आहे. त्याचे निमित्त करून कामाच्या बेशिस्तीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तब्बल आठ ते दहा मुद्यांची नोटीस पाटील यांना आस्थापना विभागाच्या वतीने बजावण्यात आली आहे. एमबी बुकवर सह्या न करणे, जीएसटी संकलनाच्या नोंदी न ठेवणे, वेळेत अहवाल सादर न करणे आदी कारणांची नोटीस पाटील यांना बजावण्यात आली आहे. शुक्रवारी भाऊसाहेब पाटील यांच्या निलंबन प्रस्तावावर मुख्याधिकाऱ्यांनी सही करून तो जिल्हाधिकारी शेखर सिंग व विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना पाठवला आहे. नोटीसीचा खुलासा करण्यासाठी पाटील यांना सात दिवसांची मुदत दिली आहे .