पुणे – सिटी सर्व्हे झालेल्या मिळकतींचे सातज्ञबारा उतारे बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा उपक्रम भूमि अभिलेख विभागाने हाती घेतला आहे. ईटीएस मशीन आणि रोव्हरच्या तंत्रज्ञानाचा वापर करून खराडी येथील 700 हेक्टरवरील मिळकतींच्या मोजणींचे काम दोन महिन्यांत भूमी अभिलेख विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून खराडीतील मिळकतदारांना कायदेशीर मालकी हक्काचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबतची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली.
राज्यातील ज्या शहरांमध्ये सर्व्हे झाला, परंतु अशा शहरात मिळकतींचे सात-बारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्हीही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सात-बारा उतारा सुरू आहे. त्यामुळे अशा शहरात जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सात-बारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे भूमि अभिलेख विभागानेया भागातील सात-बारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूमि अभिलेख विभागाने “एनआयसी’च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. रोव्हर, ईटीस मशिन आणि ड्रोन अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार खराडीत ही मोजणी झाली. मात्र ड्रोनने मोजणी करावयाच्या सुमारे 100 हेक्टर मिळकतींची ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करण्याचे काम अद्याप झालेले नाही.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
मनपा मालकीच्या मिळकतींची हद्द निश्चित होणार
रस्त्यांची क्षेत्र, लांबी, रूंदी यांची माहिती मिळणार
मिळकतींची संख्या निश्चित होणार
मिळकत कराच्या माध्यमातून महसूल वाढण्यास मदत होणार
सरकारी जमिनींची माहिती जमा होणार
लष्कराची परवानगी आवश्यक
खराडीचा काही भाग लोहगाव विमानतळाजवळ येतो. त्यामुळे त्याच भागात ड्रोनच्या सहाय्याने मोजणी करावयाची आहे. परंतु लष्काराकडून परवानगी मिळत नसल्यामुळे हे काम थांबले आहे. लवकरच ही परवानगी मिळेल. त्यानंतर हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून प्रापर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.