पुणे – शहरात दरवर्षी दि.1 जून ते 15 जुलैदरम्यान छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील रोपवाटिकेतून सुमारे 80 ते 85 हजार रोपांची विक्री होते. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ चार हजार रोपांचीच विक्री झाली आहे. पाऊस लांबल्याने हा फटका बसला आहे. याबाबत मनपा उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी माहिती दिली.
स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच शासकीय संस्थांकडून शहरातील महापालिकेच्या हद्दीतील असेच हद्दीजवळील टेकड्या तसेच महापालिकेने मान्यता दिलेल्या वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण केले जाते. महापालिकेकडून या रोपवाटिकेमधून नागरिकांना फक्त पाच रुपयांत देशी प्रजातींच्या झाडांची रोपे दिली जातात. तर, शहरात दरवर्षी सर्वसाधारणपणे दि. 7 ते 10 जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरूवात होते.
तर जूनअखेरीस तसेच जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे विविध संस्था तसेच पर्यावरण प्रेमींकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. सर्वसाधारणपणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या पूर्वमोसमी पावसानंतरच महापालिकेकडे रोपांची मागणी वाढते. तर पावसाळ्यात दि.1 जून ते 15 जुलै या कालावधीत जवळपास 70 ते 80 हजार रोपांची विक्री दरवर्षी होते. पण, यंदा संपूर्ण जूनमध्ये केवळ चार हजार रोपांची विक्री झालेली आहे.