“स्वयम’ पोर्टलवर सुविधा उपलब्ध : मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा उपक्रम
पुणे – अध्यापन प्रभावी होण्यासाठी व अद्ययावत ज्ञानासाठी प्राध्यापकांना आवश्यक असणारा रिफ्रेशर ऑनलाइन कोर्स केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या (एमएचआरडी) “स्वयम’ पोर्टलवरून प्राप्त करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी “स्वयम’ पोर्टलवर रिफ्रेशर कोर्ससाठी नोंदणी करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या तिपटीने वाढल्याचे “एमएचआरडी’ने स्पष्ट केले. यात विशेषत: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत उपलब्ध करण्यात आलेल्या कोर्सेसकडे प्राध्यापकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व प्राध्यापकांना रिफ्रेशर कोर्स बंधनकारक केला आहे. त्यामुळे देशभरातील प्राध्यापकांकडून आता ऑनलाइन रिफ्रेशर कोर्स पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तर, पुणे विद्यापीठाकडून चालविल्या जात असलेल्या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी देशभरातील 6 हजार 75 प्राध्यापकांनी नोंदणी केल्याचे ट्विट “एमएचआरडी’चे सचिव आर. सुब्रमन्यम यांनी रविवारी केले.
गेल्या वर्षापासून “स्वयम’ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन रिफ्रेशर कोर्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. गतवर्षी देशभरातून केवळ 50 हजार प्राध्यापकांनी विद्यापीठांकडून ऑनलाइन पध्दतीने चालविल्या जाणा-या विविध अभ्यासक्रमांसाठी कोर्ससाठी नोंदणी केली होती. मात्र, यंदा नोंदणी करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या 1 लाख 46 हजार 280 पर्यंत गेल्याची माहिती आर. सुब्रमन्यम यांनी दिली.
पाटणा आयआयटीला सर्वाधिक पसंती
पाटणा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) अभ्यासक्रमास देशभरातील सर्वाधिक प्राध्यापकांनी नोंदणी केली आहे. त्या खालोखाल गुजरात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास नोंदणी केली आहे. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेनॉलॉजी टीचर्स टेलनिंग ऍण्ड रिसर्च, चंदिगड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या अर्थशास्त्र व वाणिज्य अभ्यासक्रमास प्राध्यापकांकडून नोंदणी करण्यात आली आहे.