विनाअनुदानित महाविद्यालयांना ‘नॅक’चे वावडे

1 हजार 837 पैकी 1 हजार 658 महाविद्यालयांची मूल्यांकनाकडे पाठ


केवळ 179 महाविद्यालयांनीच केले मूल्यांकन

पुणे – राज्यातील मान्यताप्राप्त 1 हजार 837 पैकी तब्बल 1 हजार 658 वरिष्ठ विनाअनुदानित महाविद्यालयांनी “नॅक’ मूल्यांकनाकडे पाठ फिरविली आहे. तर केवळ 179 महाविद्यालयांनीच करून घेतले आहे. याबाबत महाविद्यालयांना उच्च शिक्षण संचालक, संबंधित विद्यापीठ यांच्याकडून वांरवार सूचना देऊनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.

अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्वच महाविद्यालयांनी राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) मानांकन मिळविणे आवश्‍यक असून त्याबाबतचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सतत जारी केले जातात. अनुदानित महाविद्यालयांकडून त्याचा धसका घेऊन अंमलबजावणी करण्यात येत असली तरी विनाअनुदानित महाविद्यालयांनी मात्र आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये “नॅक’ मूल्यांकनाबाबत निरुत्साह असल्याचे आढळून येते. नवीन शाखा, वाढीव तुकड्या, विविध योजनेअंतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी अनुदान प्राप्त करणे आदींसाठी “नॅक’ मूल्यांकन करून घेणे सक्‍तीचे आहे. मात्र, हे न केल्यामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांना यापासून वंचितच रहावे लागते.

“नॅक’ मूल्यांकन करून घेण्यासाठी आधी सर्व सुविधा सज्ज कराव्या लागतात. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या फीमधून जमा होणारी रक्‍कम प्राध्यापक, कर्मचारी व इतर कामांसाठीच खर्च करावी लागते. यामुळे खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागते. “नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जाताना आवश्‍यक तेवढा खर्च करण्याची क्षमता नसल्याचे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे “नॅक’ करून घेण्यासाठी धाडसच होत नाही, असे विनाअनुदानित महाविद्यालयांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयांना सतत सहकार्याचीच भूमिका
विनाअनुदानित महाविद्यालयांनाही “नॅक’ मूल्यांकन करावे यासाठी त्यांना अनेकदा पत्र पाठविण्यात येतात. मात्र, त्याची त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या महाविद्यालयांना “नॅक’ मूल्यांकनासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात येते. कार्यशाळाही घेण्यात येतात मात्र, तरीही फारसा प्रतिसाद मिळत नाही. या महाविद्यालयांमध्ये “नॅक’ मूल्यांकनाबाबात जागृती निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरूच ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.