कराड – कराड नगरपालिकेची सोमवार, दि. 21 रोजी झालेली ऑनलाइन सर्वसाधारण सभा वादळी झाली. 120 विषय असलेल्या जम्बो सर्वसाधारण सभेत ऐनवेळी उपस्थित दोन विषयांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये काही मुद्यांवरून वादावादी झाली. दरम्यान, नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात सदस्यांनी तीव्र घोषणाबाजी केली. दरम्यान, पालिकेची सात महिन्यानंतर झालेली ऑनलाइन सर्वसाधारण सभा अखेर वादळी ठरली.
सोमवार, दि. 21 रोजी नगरपालिकेची सात महिन्यानंतर ऑनलाइन जम्बो सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी रोहिणी शिंदे होत्या. दुपारी बारानंतर सुरु झालेली सभा सायंकाळपर्यंत सुरू होती. या सभेत एनवेळच्या दोन विषयांसह 122 विषयांवर चर्चा झाली. नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी सुरुवातीलाच सात महिने होऊनही फेब्रुुवारीच्या सभेचे प्रोसिडिंग पूर्ण का करण्यात आलेले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला नगरसेवक विनायक पावसकर यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले, नगराध्यक्षा आणि त्यांचे कुटूंबीय करोनाबाधित झाल्याने सदर प्रोसेडिंग पूर्ण झाले नसल्याने त्यावर सही झालेली नाही. तसेच तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डागे यांनी यातील काही सहीला आलेले ठराव पुन्हा बदलून दिले असल्याचा आरोप पावसकर यांनी यावेळी केला.
येथील कराड बाजार समितीच्या स्वागत कमानीच्या मंजूरीप्रश्नी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील म्हणाले, बाजार समिती स्वागत कमानीच्या बांधकामप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, सदर नोटीस देऊनही बाजार समितीच्या कमानीचे काम सुरू ठेवण्यात आले. ही बाजार समितीची मुजोरी आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मात्र, सदर काम थांबवण्यात आलेले नाही. अतिक्रमणाच्या अपप्रवृत्तीला पाठीशी घालू नका, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचेही सौरभ पाटील यांनी यावेळी सांगितले. या मुद्यावरून काही काळ सभेमध्ये गोंधळ झाला.
दरम्यान, आशा सेविकांना कमी मानधन आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या त्यांचे काम पाहता त्यांना वाढीव मदत करता येऊ शकते का? या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरपालिका फंडातून मदत करणे शक्य असल्याचे सांगितले. शहरात 28 आशा सेविका असून त्यांना 14 व्या वित्त आयोगातून वाढीव मदत करा, अशी सूचना सदस्यांनी मांडली. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान, प्रोत्साहनपर भत्ता आदी विषयांनाही या सभेत मंजूरी देण्यात आली.
दरम्यान, नगरपालिकेच्या 120 विषयांचा समावेश असलेली जम्बो सर्वसाधारण सभा कशी पार पडणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सृकता होती. तसेच गत महिन्यात पालिकेत दाखल झालेले रमाकांत डाके यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. ते ही सभा कशी हाताळतात याबाबत सदस्यांसह नागरिकांमध्येही उत्सुकता होती.
तसेच ही सभा सात महिन्यानंतर होत असल्याने या सभेची सदस्यांसह नागरिकांनाही उत्सुकता लागून राहिली होती. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली नगरपालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा सायंकाळी उशिरापर्यंत चालल्याने नागरिकांमध्ये याबाबत दिवसभर चर्चा सुरु होती.