पुणे – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्यांचा “डेटा क्लाऊड’ प्रणालीवर ट्रान्सफर केला असला तरीही यामध्ये वेळोवेळी सर्व्हर बंद पडणे, सर्व्हरचा वेग कमी असणे, या समस्यांना अजूनही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दस्त नोंदणीबरोबरच ऑनलाइन भाडेकराराची नोंदणी करतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांमुळे दस्त नोंदणीसाठी तसेच भाडेकरारासाठी नागरिकांचा वेळ वाया जातो. तसेच, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
ऑनलाइन भाडेकरार नोंदविताना येणाऱ्या समस्यांबाबत “असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस’च्या संघटनेने गुरुवारी नोंदणी महानिरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी, उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, उमाशंकर यादव, गणेश शेलार, नंदकुमार संचेती आदी उपस्थित होते.
हवेली क्रमांक 28 मधील अपुऱ्या मनुष्यबळामुळे नोंदविलेले दस्त रजिस्ट्रर होण्यासाठी 15 ते 30 दिवसांचा कालावधी लागत असून या आठवड्यात सुमारे 2 हजार दस्त प्रलंबित आहेत. त्यामुळे नविन पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
यासंदर्भात तक्रार निवारणासाठी “सारथी’ हेल्पलाइन सुरू केली आहे. परंतु, जेव्हा अडचणीमध्ये वाढ होते, त्यावेळी हेल्पलाइन बंद पडते. हेल्पलाइनवरील कर्मचारी हा प्रशिक्षित नसून अडचणी संदर्भातील उत्तरे देण्यासाठी व तक्रार निवारणासाठी लागणारा अवधी या संदर्भात निरसनासाठी अनभिज्ञ असतात. अनेक अडचणींच्या समाधानासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
काही अत्यावश्यक कारणांसाठी दुरुस्तीसाठी सर्व्हर बंद करणार असतील तर त्यांची पूर्वकल्पना देण्यात यावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.