पुणे – चांदणी चौकाच्या उड्डाणपुलासाठी 90 टक्क्यांपेक्षा अधिक जागा ताब्यात आल्याचे हमीपत्र महापालिकेकडून देण्यात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचआय)ने या पुलाचे काम सुरू केले आहे. मात्र, आता भूसंपादनाचा नवा तिढा उभा राहिला आहे. पुलासाठी जागा देताना काही जागा मालकांनी टीडीआरचा मोबदला घेण्याची तयारी दर्शविली होती. तसेच जागा देण्याचे हमीपत्रही पालिकेस दिले होते. मात्र, आता या जागा मालकांनी आयत्यावेळी टीडीआरऐवजी रोख रकमेची मागणी केली आहे. त्यांना ही रक्कम द्यायची झाल्यास ती काही कोटींमध्ये आहे. त्यामुळे या जागा मालकांना आता निधी द्यायचा कुठून असा प्रश्न पडला आहे.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर तब्बल वर्षभराने काम सुरू झाले. पुलासाठी महापालिकेस सुमारे 13.99 हेक्टर भूसंपादन करावे लागणार होते. त्यासाठी निधी नसल्याने राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सुमारे 185 कोटींचे अनुदान मंजूर केले. तर, हे काम “एनएचएआय’ करणार असल्याने त्यांनी 80 टक्के भूसंपादनाची अट घातली होती. त्यामुळे शासनाकडून मिळणारे अनुदानाची कल्पना नसल्याने महापालिकेने भूसंपादनासाठी जागा मालकांना टीडीआर घेण्यास तयार केले होते. त्यास काही जागा मालकांनी सहमतीही दर्शविली होती. त्यानुसार या जागा मालकांना टीडीआर तातडीने देऊन त्यांची जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र कक्षही स्थापन केला आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू असतानाच, शासनाने जागा मोबदला देण्यासाठी पालिकेस 185 कोटींचे अनुदान मंजूर केले. त्यामुळे काही जागा मालकांनी आता टीडीआर स्वीकारण्यास नकार देत, रोख रक्कम द्यावी असा आग्रह धरला आहे.
अशी आहे जागेची स्थिती
चांदणी चौकात उड्डाणपुलासाठी 31.76 हेक्टर जागा लागणार होती. त्यातील सुमारे 13.2 हेक्टर जागा “एनएचएआय’च्या ताब्यात असून ती महामार्गासाठीची आहे. तर उर्वरीत 18.56 हेक्टर भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेची होती. यात 4.57 टक्के जागा ताब्यात होती. उर्वरित 13.99 हेक्टर खासगी जागा होती. त्याचे भूसंपादन सुरू होते. या 13.99 हेक्टरमधील 10.55 हेक्टर खासगी जागेचे संपादन झाले असून उर्वरित 2 टक्के जागेचे संपादन अंतिम टप्प्यात आहे.