जबलपूर – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडताना राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या या सरकारच्या 220 महिन्यांच्या राजवटीत 225 घोटाळे झाले आहेत. इतकेच नाही तर भाजप सरकारने येथे गेल्या तीन वर्षात केवळ 21 जणांना सरकारी नोकरी दिली आहे. चौहान सरकारने देवालाही सोडले नाहीं असे नमूद करीत त्यांनी उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉर मधील सहा मोठ्या मुर्तींचे अलिकडेच वादळात जे नुकसान झाले त्याचाही प्रियंकांनी उल्लेख केला.
प्रियंकांच्या या रॅलिला स्थानिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कॉंग्रेसनेही त्यांच्या या सभेसाठी जय्यत तयारी केली होती. शहरातील सभा स्थानी तसेच काही मोठ्या चौकात महाबली हनुमानाच्या गदेची प्रतिमा लावण्यात आली होती. तसेच हनुमानाच्या वेषातील एक इसम कॉंग्रेसने तैनात ठेवला होता. कर्नाटकात कॉंग्रेसने हनुमानाचा अवमान केल्याचा प्रचार पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी केला होता. पण हा प्रचार भाजपवरच उलटला आणि बजरंगबलीने कॉंग्रेसला साथ दिली असे कॉंग्रेस जनांकडून सांगितले जात आहे त्याच आधारावर मध्यप्रदेशातील कॉंग्रेसने बजरंगबलीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे.
या सभेत प्रियंकांनी शिवराजसिंह चौहान सरकारच्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट कारभाराची अनेक उदाहरणे देत त्यांच्यावर जोरदार प्रहार केले. त्या म्हणाल्या की राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षात केवळ 21 जणांनाच सरकारी नोकरी दिली असल्याची माहिती मला मिळाल्यानंतर मी माझ्या कार्यालयामार्फत तीन-तीन वेळा ही माहिती चेक केली. त्यावेळी ही माहिती योग्यच असल्याचे मला सांगण्यात आले असे त्या म्हणाल्या. त्यांनी व्यापम घोटाळा आणि रेशन वितरणातील कथित भ्रष्टाचाराचा उल्लेख केला आणि सांगितले की राज्यात भारतीय जनता पक्षाच्या 220 महिन्यांच्या राजवटीत 225 “घोटाळे” झाले आहेत.
भाजपच्या वतीने विविध राज्यांमध्ये नेहमी “डबल-इंजिन सरकार”चा उल्लेख केला जातो. त्याची खिल्ली उडवताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आम्ही अनेक दुहेरी आणि तिहेरी-इंजिन सरकारे पाहिली आहेत, परंतु हिमाचल आणि कर्नाटकच्या लोकांनी अशा प्रचाराला मतदानात चोख प्रत्युत्तर दिले आहे.ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षांतर करून भाजपला साथ दिल्यानेच मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार पडले, त्याचा उल्लेख करीत त्यांनी शिंदे यांच्यावरही टीका केली. तथापि त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव मात्र घेतले नाही.