प्रियांका चोप्रा हल्ली “द स्काय इज पिंक’या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात प्रियंकासह फरहान अख्तर आणि जायरा वसिम लीड रोलमध्ये आहेत. याच दरम्यान अहमदाबादमध्ये प्रियंका नवरात्रीनिमित्त दुर्गादेवीच्या मांडवाबाहेर चक्क दांडिया खेळताना दिसली होती. या वेळी तिच्याबरोबर तिचा कोस्टार रोहित सराफही होता.
हे दोघेही दांडीया खेळण्यामध्ये मश्गुल झाले असल्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड झाले आहेत. प्रियांकाने ब्लॅक ऍन्ड सिल्व्हर सूटमध्ये होती. अगदी सरावल्याप्रमाणे ती दांडिया खेळत बेभान झालेली व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते आहे. तिला या दांडियामध्ये नाचताना बघून हे तिच्या सिनेमाचे प्रमोशन असावे, असे काही जणांना वाटले असावे.
मात्र तसे काहीही नव्हते. उलट तिने मनसोक्त नाचण्यासाठीच या गरबामध्ये सहभाग घेतला होता. प्रियांकाचा “द स्काय इज पिंक’ हा 11 ऑक्टोबरला रिलीज होतो आहे. टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यासाठी प्रियांका आपल्या सहकलाकारांसह टोरांटोला पोहोचली होती. प्रिमिअरनंतर सर्व कलाकारांशी प्रसिद्धी माध्यमांबरोबर संवादही साधण्यात आला.