प्रशांत जाधव
विशेष कक्ष स्थापन; पोलीस मुख्यालयात कार्यालय
सातारा – अवैध धंदे करून त्यातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर खासगी सावकारी करायची आणि त्यातून सर्वसामान्यांची पिळवणूक करून बक्कळ पैसा कमवायचा, असे धंदे जिल्ह्याने पाहिले आहेत. मात्र, आता जिल्ह्यातील खासगी सावकारांची खैर नाही. अशा सावकारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून तक्रारदारांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात खासगी सावकारी विरोधात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात खासगी सावकारांनी थैमान घातले होते. त्याला तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी चांगलाच आवर घातला होता. त्यांच्या कार्यकाळात काही मोठे मासे गळाला लागले होते. मात्र, त्यांचे काम पाहणारे टोळीप्रमुख आणि “व्हाइट कॉलर’ खासगी सावकार बचावले गेले होते.
“सुंभ जळाले तरी “पीळ’ कायम राहिल्याने जिल्ह्यातील खासगी सावकारी पूर्णपणे संपवणे पोलीस दलाला शक्य झालेले नाही. बागायती शेती मोठ्या प्रमाणात असलेल्या कराड तालुक्यात आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण, खटाव, फलटण या तालुक्यांमधील खासगी सावकारांनी शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले असून वाई, साताऱ्यासह ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, कंपन्यांचे मालकही सावकारांच्या जाळ्यात फसले आहेत.
अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी, कर्जाच्या रकमेच्या बदल्यात जमीन, घर, गाड्या तारण घेतल्या जातात. दरमहा दहा ते 25 टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केली जाते. त्यामुळे कर्जाच्या रकमेच्या कैकपटींनी पैसे खासगी सावकराला मोजले तरी मूळ कर्ज काही केल्या फिटत नाही. मग, तारण घेतलेली वस्तू सावकार गिळंकृत करतात. अशा अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
कळस म्हणजे साताऱ्यात काही सावकारांच्या नजरा कर्जदाराच्या घरातील महिलांवर गेल्या होत्या. हे खासगी सावकार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसांना राजकीय दबावाला सामोरे जावे लागते. संदीप पाटील यांनी राजकीय दबाव झुगारून कारवाया केल्याने जिल्ह्यातील खासगी सावकरी पूर्णपणे मोडीत निघेल, अशी अपेक्षा होती.
मात्र, त्यातील काही सावकारांना वरिष्ठ पातळीवरून राजाश्रय मिळत गेल्याने जिल्ह्यात पुन्हा खासगी सावकारांनी डोके वर काढले आहे. खासगी सावकारांची वाढती मुजोरी अन् त्रस्त जनतेचा टाहो लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खासगी सावकारीचे कंबरडे मोडण्याचा विडा उचलला आहे. पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातच आता खासगी सावकारीच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
खटाव तालुक्यातही लक्ष घाला
शहरी भागांमध्ये काही घडले की, माध्यमांचे व पोलीस यंत्रणांचे त्याकडे तातडीने लक्ष जाते. मात्र, ग्रामीण भागात काही अडचणीमुळे या घटना लगेच उजेडात येत नाहीत. खटाव तालुक्यातही खासगी सावकारीने हातपाय पसरले आहेत. अनेकांनी व्याजाच्या रकमेपोटी जमिनी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे वडूज, मायणीसारख्या महत्त्वाच्या गावांमधील सावकारीकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनीच लक्ष घालावी, अशी मागणी मायणीतील सावकाराच्या त्रासाने वैतागलेल्या नागरिकाने “प्रभात’शी बोलताना केली.