पालिकेने दिले 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश
पुणे : शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने शहरात खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना बेड मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीनं सोमवारी खासगी हॉस्पिटलची बैठक घेतली. या बैठकीत सर्व रुग्णालयांनी 50 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत. मात्र, अनेक हॉस्पिटलने इतर रुग्णांचे कारण पुढे करत बेड देण्यास नकार दर्शविला आहे.
त्यामुळे या रूग्णालयांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून बेड न दिल्यास ते सक्तीने ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली. या बैठकीस सुमारे 45 हॉस्पीटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापिालका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सह आरोग्य अधिकारी मनिषा नाईक यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. अग्रवाल म्हणाल्या की, रुग्णालयांबरोबर झालेल्या बैठकीत त्यांच्या प्रतिनिधींना एकुण क्षमतेच्या पन्नास टक्के बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यास सांगण्यात आले आहे. काही रुग्णालयांनी आम्ही ही संख्या टप्प्या टप्प्याने वाढवू असे नमूद करीत तयारी दाखविली आहे.
परंतु, कोरोना व्यतिरीक्त इतर आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने बेडस उपलब्ध होऊ शकणार नाहीत असे काहींनी सांगितले. तर काही रुग्णालयांनी इतर आता आमाच्याकडे कोरोनाचे रुग्ण नको अशी भुमिका घेतली आहे. रुग्णालयांनी जर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव ठेवले नाही तर पुर्वीच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेतले जातील.