सातारा – महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या शनिवारी झालेल्या अंतिम फेरीमध्ये कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने अत्यंत दिमाखात मानाची गदा पटकावली. या लढतीमध्ये मुंबईच्या विशाल बनकर याचा पृथ्वीराजने शेवटच्या दीड मिनिटांमध्ये दुहेरी पट काढून पाच विरुद्ध चार गुणांनी पराभव करताच पृथ्वीराज समर्थकांनी त्याला उचलून घेत आखाड्यामध्ये एकच जल्लोष केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी विजेत्या पृथ्वीराज पाटील याला चांदीची मानाची गदा देण्यात आली. साताऱ्यातील क्रीडा संकुलात 25000 कुस्ती शौकिनांनी या कुस्तीचा थरार अनुभवला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा कोण पटकावणार याची महाराष्ट्राच्या कुस्ती वर्तुळामध्ये प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती. अंतिम फेरीमध्ये कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील तर मुंबईच्या विशाल बनकर यांनी मुसंडी मारत भल्याभल्या दावेदारांना उपांत्यपूर्व फेरीमध्ये गारद केले होते. सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पद्मश्री महाबली सतपाल सिंग आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, संयोजक दीपक पवार, साहेबराव पवार, सुधीर पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही मल्लांनी हस्तांदोलन केले.
पंच रवी बोत्रे यांनी सात वाजून दहा मिनिटांनी पुकारा केला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या थरारक लढतीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पहिला एक मिनिटातच दोन्ही मल्लांनी चपळाईने एकमेकांचा पट काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्लॉकिंग हात पकडून ठेवण्याच्या विशाल बनकर यांच्या पद्धतीला पंचांनी आक्षेप घेऊन त्याला वॉर्निंग दिली. त्यानंतर तीस सेकंदांमध्ये दोन्ही मल्ल कोणत्याही चढाईशिवाय एकमेकांशी झुंजत राहिले. विशालने काही जोरदार चाली रचत पृथ्वीराजला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला.
विशालने त्याच्या उंचीचा उपयोग करून पृथ्वीराजला कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पृथ्वीराजने आकडी डावावर प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवत 4-1 अशी आघाडी घेतली. या पहिल्या फेरीमध्ये जोरदार डाव- प्रतिडाव पाहायला मिळाले. एकेरी पटाचासुद्धा दोन्ही मल्लांनी प्रयत्न करत एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. विशालने आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि मात्र पृथ्वीराज याने कोणतीही संधी दिली नाही. शेवटच्या दीड मिनिटांमध्ये पुन्हा जोरदार हालचाल करत त्याने विशाल बनकरचा दुहेरी पट काढत जोरदार टक्कर दिली.
शेवटच्या मिनिटामध्ये पुन्हा विशालवर जोरदार चढाई करत पाच विरुद्ध चार अशा गुणांच्या फरकाने ही लढत जिंकली. त्यामुळे पंच रवी बोत्रे यांनी पृथ्वीराजला विजयी घोषित करताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. समर्थकांनी त्याला उचलून घेत संपूर्ण आखाड्याला फेरी मारली. कुस्ती शौकिनांनी सुद्धा पृथ्वीराजच्या खेळीला जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. व्यासपीठावरील सर्व लोकप्रतिनिधीं व मान्यवरांनी या थरारक कुस्तीचा आनंद लुटला. पृथ्वीराज पाटील मूळचा कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. संग्राम पाटील यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे गिरवले. यंदाचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने प्रतिनिधित्व करत प्राथमिक फेरीपासून अंतिम फेरीत धडक मारत नामवंत मल्लांना चितपट केले. पदकाची कमाई केली.
आक्रमक तंत्रकौशल्यामुळे विजय ः पृथ्वीराज
गादी कुस्तीवरील अनेक बारकाव्यांचा उपयोग झाला आणि सातत्याचा सराव त्याचबरोबर आपल्या आक्रमक खेळाला तंत्र कौशल्याची जोड दिल्यामुळे यश मिळाल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद मिळाल्यावर माध्यमांना सांगितले.