टाकळी हाजी-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ सभा रविवारी (दि. 19) दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी दिली.
कोल्हापूर येथील गणेश लॉन्स येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय महामंडळ सभेचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भूषविणार आहेत. या महामंडळ सभेस प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृहराज्य मंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तर स्वागताध्यक्ष शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात हे उपस्थित रहाणार आहेत, असे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माउली पुंडे यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय महामंडळ सभेत राज्यातील शिक्षण, विद्यार्थी व शिक्षकांचे प्रश्न मांडणार आहेत. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकांच्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करुन सर्वसमावेशक धोरण तयार करावे, त्यात विस्थापित व रॅन्डम राऊंड मध्ये गेलेल्या शिक्षकांना प्रथम संधी द्यावी. वस्ती शाळेतून शिक्षकांचा दर्जा मिळालेल्या निदेशकांची सेवाज्येष्ठसाठी मूळ सेवा ग्राह्य धरुन आर्थिक लाभ देण्यात यावा. शिक्षकांना बीएलओसह इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करावे.
वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांनाही कॅशलेस सुविधा देण्यात यावी. केंद्रप्रमुखाची पदे पूर्वीप्रमाणेच प्राथमिक पदवीधर शिक्षकांतुन पदोन्नतीने भरावीत. नगर पालिका व महानगर पालिकेतील शिक्षकांना 7 वा वेतन आयोग लागू करावा. संगणक प्रशिक्षणास मुदत वाढ देऊन केलेली वसुली परत करावी. या सह अनेक प्रश्नांची उकल या महामंडळ सभेत करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील शिक्षकांनी या महामंडळ सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोष थोपटे व महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना गावडे यांनी केले.