कराड -पुणे-कोल्हापूरच्या मध्यावर आणि रत्नागिरी, सांगली, सोलापूर जिल्ह्याची मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड शहरातील नागरिकांना करोना या महाभयंकर संकटाने चांगलेच हैराण केले आहे. या करोनाला शहराबाहेर रोखण्यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आदींसह महत्वाच्या गोष्टींच्या अंमलबजावणीसाठी शहरातील अकरा प्रभागात करोना प्रतिबंधात्मक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊनहॉल) येथे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, राजेंद्र यादव, सुहास जगताप, मोहसीन आंबेकरी, विनायक पावसकर, आप्पा माने, फारूक पटवेकर, हणमंत पवार, महेश कांबळे, पल्लवी पवार, विद्या पावसकर, अंजली कुंभार, स्मिता हुलवान, मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार उपस्थित होते.
कराड तालुका सातारा जिल्ह्यात करोना व्हायरसचे आगार बनला आहे. लगतच्या मलकापूर नगरपालिका तसेच कराड शहराच्या चौफेर म्हणजे ओगलेवाडी, बाबरमाची, वनवासमाची, गोटे, आगाशिवनगर आदी मोठ्या गावांसह तालुक्यातील अन्य गावात मोठयाप्रमाणावर करोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर कराड शहरातील रूक्मिणीनगर, मंगळवारपेठ येथे बाधीत रूग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण आहे.
कराड शहरात सुमारे 80 हजार लोक वास्तव्यास आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कराड पालिका करोनाबाबतच्या सर्व उपाययोजना करत आहे. परंतु, करोनाला मोठ्या ताकदीवर रोखण्यासाठी शहरात प्रतिबंधात्मक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन, मास्क वापर, जीवनावश्यक वस्तू, औषध, भाजीपाला आदींचा पुरवठा करणे तसेच नागरिकांच्या हालचाली व शहरात बाहेरून नव्याने येणाऱ्या लोकांची माहिती संकलनाचे कामही नगरसेवक व समितीकडून केले जाणार आहे.