नवी दिल्ली – लाभाच्या पद प्रकरणी दिल्लीतल्या आम आदमी पार्टीच्या 11 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या मताच्या आधारे राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला अहे.
दिल्लीतल्या 11 जिल्ह्यांमधे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहअध्यक्ष म्हणून या आमदारांनी लाभाच्या पदाचा उपयोग केल्याचा दावा करणारी याचिका मार्च 2017 मधे राष्ट्रपतींकडे दाखल झाली होती. विवेक गर्ग यांनी ही याचिका राष्ट्रपतींकडे केली होती. दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांच्यासह 11 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली होती.
त्यावर निवडणूक आयोगाने आपले मत दोन महिन्यांपूर्वी दिले होते. या पदांवर काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भत्त्यांची तरतूद नाही, त्यामुळे याबाबीवरुन आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असे आयोगाने सांगितले. त्यामुळे राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळून लावली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारी, 2020 रोजी संपणार असून येत्या काही आठवड्यात तेथे निवडणुका जाहीर होऊ शकतात.