पिंपरी – कोविड-19 चे लसीकरण केलेल्या आरोग्य सेवा देणाऱ्या तीन अधिकारी व कर्मचारी यांना कोविडची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे महापालिका वैद्यकीय विभागामार्फत लसीकरणानंतरही नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.
कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये सध्या आरोग्य सेवा देणाऱ्या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात येत आहे. मात्र, लस घेतल्यानंतरही कोविडची बाधा झाल्याची घटना पुढे आल्याने महापालिका प्रशासनाकडून याबाबत अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19 चे लसीकरण दोन टप्प्यांमध्ये करण्यात येते. पहिल्या डोसनंतर साधारणत: 8 ते 10 दिवसानंतर शरीरात प्रतिपिंडे (एन्टीबॉडीज) तयार होतात. तसेच, पहिल्या डोसनंतर साधारणत: 65 टक्के इतकी प्रतिकारक्षमता तयार होते. दुसऱ्या डोसनंतर साधारणत: 10 ते 15 दिवसानंतर शरीरात उर्वरित प्रतिपिंडे (एन्टाबॉडीज) तयार होतात. तसेच, दोन्ही डोस घेतल्यानंतर 70 ते 90 टक्के इतकी प्रतिकारक्षमता तयार होते. त्यामुळे कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणानंतरही नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे.