नवी दिल्ली (वंदना बर्वे) – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीचे रणनितीकार प्रशांत किशोर यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कॉंग्रेसची स्ट्रॅटेजी ठरविण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली असल्याचे समजते.
कॉंग्रेसमधील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीत पक्षाची निवडणूक स्ट्रॅटेजी ठरविणारे प्रशांत किशोर यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना माहिती दिली आहे. प्रशांत किशोर यांची भूमिका आणि पद ठरविण्यासाठी सल्ला द्यावा, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांना महासचिव बनविले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.
2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर कॉंग्रेसचे धोरण ठरविणार आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना काही विचारायचे असेल? किंवा काही शंका असेल? तर त्यांनी थेट प्रशांत किशोर यांनाच विचारावे. तेच सर्व प्रश्नांचे उत्तर देतील.
प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेत्यांना 52 स्लाईडचे प्रेजेंटेशन दिले आहे. यातील 18 स्लाईड या कॉंग्रेसच्या संवाद धोरणाशी संबधित आहे.
देशातील कोणत्या कोणत्या राज्यात कॉंग्रेसच्या जागा वाढू शकतात याची माहिती 10 स्लाईडमधून देण्यत आली आहे. चार स्लाईडमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या राज्यात पक्षाला ताबडतोब मजबूत करण्याची गरज आहे. चारपाच स्लाईडमध्ये कोणत्या राज्यात कॉंग्रेसने स्थानिक पक्षांशी आघाडी करायला पाहिजे, याची माहिती देण्यात आली आहे. तर, कॉंग्रेसची पत आणि प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कायकाय करण्याची गरज आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रशांत किशोर यांनी मागील तीन दिवसात सोनिया गांधी यांची दोनवेळा भेट घेतली आहे.
यापूर्वी, किशोर यांनी शनिवारी कॉंग्रेस अध्यक्षांची भेट घेवून 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या मुद्यावर महत्वाची चर्चा केली होती. कॉंग्रेसचे काही नेते प्रशांत किशोर यांनी दिलेल्या माहितीचा अभ्यास करणार आहेत. यानंतर नेत्यांचा हा गट आपली रिपोर्ट सोनिया गांधी यांना देणार आहे आणि एका आठवड्यात काय तो अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.