नवी दिल्ली: संयुक्त जनता दलातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आता द्रमुकसाठी राजकीय रणनिती सल्लागार म्हणून काम करण्याचे ठरवले आहे. प्रशांत किशोर यांच्या “इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी’ (आय-पॅक) बरोबर द्रमुकने 2021 च्या विधानसभा निवडणूकीसाठी सहकार्य करार केला असल्याची माहिती द्रमुकचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी सांगितले आहे.
तामिळनाडूमधील अनेक युवा आणि हुशार, कर्तबगार जाणते व्यक्ती “आय-पॅक’बरोबर कामामध्ये सहभागी झाले आहेत. याचा आपल्याला आनंद वाटतो आहे. तामिळनाडूला जुने उज्ज्वल दिवस पुन्हा प्रदान करण्याची आपली योजना यामुळे यशस्वी होऊ शकेल, असे स्टॅलिन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
“आय-पॅक’ची टीम द्रमुकला 2021 च्या विधानसभा निवडणूकीसाठी मदत करणार आहे. तसेच तामिळनाडूचा विकास करण्यासाठीही मार्गदर्शन करणार आहे, असे “आय-पॅक’नेही म्हटले आहे. “आय-पॅक’ची टीम राजकीय पक्षांना लोकाभिमुख कार्यक्रमांचे नियोजन करण्यास मदत करते. तसेच जनमानसाचा कल पाहून आपली रणनिती निश्चित करण्यास मदत करते. व्यापक जनाधार निर्माण करण्यासाठी या मार्गदर्शनाचा उपयोग होतो, असे “आय-पॅक’च्या वेबसाईटने म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांनी यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी नरेंद्र मोदी, 2015 साली बिहारमध्ये नितीश कुमार, 2017 साली पंजाबमध्ये कॅ.अमरिंदर सिंग आणि 2019 साली आंध्रप्रदेशातील विधानसभा निवडणूकीपूर्वी जगनमोहन रेड्डी यांना असेच मार्गदर्शन केल्यामुळे हे नेते विजयी झाले होते.
Happy to share that many bright & like-minded young professionals of Tamil Nadu are joining us under the banner of @IndianPAC to work with us on our 2021 election and help shape our plans to restore TN to its former glory!
— M.K.Stalin (@mkstalin) February 2, 2020