गंजम (ओडिशा) : सर्वाधिक बोटे असलेली व्यक्ती म्हणून ओडिसा येथील एका 63 वर्षीय महिलेचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. कुमारी नायक असे या महिलेचे नाव आहे. दुर्देवाने या वेगळ्या वैशिष्ठ्याने तिने आपले आयुष्य बंद दाराआड आणि एकाकीपणाने घालवले. त्यांच्या पायाला 19 तर हाताला 12 बोटे आहेत.
त्यांच्या या अतिरिक्त बोटांमुळे या महिलेला काहीशी प्रसिध्दी मिळाली असली तरी वैद्यकीय उपचार घेण्यासाठी या महिलेकडे पुरेसे पैसे नसल्याची खंत त्या व्यक्त करतात. रस्त्यात काही लोक मला टाळतात. काही जण मला चेटकीण म्हणतात, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली. या दोषांसह माझा जन्म झाला. गरीब घरातील असल्यामुळे मी यावर उपचारही करू शकले नाही. अशाच स्थितीत मी आयुष्याची 63 वर्षे व्यतीत केली. माझे शेजारी खुपच अंधश्रध्द आहेत. ते मला चेटकीण म्हणत लांबच ठेवतात.
मला जबरदस्तीने घरात कोंडून ठेवले जाते. मला घराबहेर पडू न देणे हाच माझ्या शेजाऱ्यांच्या दृष्टीने योग्य उपचार आहेत, असे कुमारी यांनी सांगितले. कुमारी यांच्या शेजाऱ्यांच्या मते , या अंधश्रध्देवर ग्रामस्थांचा खूपच विश्वास आहे. संपूर्ण ओडिशावरच अंधश्रध्देचा पगडा आहे. मला माहित आहे त्यांना वैद्यकीय समस्या आहे. लोक काय म्हणतात याची मला फिकीर नाही. तिच्यावर उपचार करता येत नाहीत याचे मलाच खूप वाईट वाटते, असे एक शेजारी म्हणाला.
नायक यांनी अनेक वर्ष एकाकीच घालवली आहेत. पण आता सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी तिला घर आणि पेन्शन देऊ केले आहे. त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि एकाकीपणा कमी व्हावा म्हणून आम्ही शेजाऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करू. यापुर्वी सर्वाधिक बोटे असण्याचा विक्रम देवेंद्र सुतार यांच्या नावावर 2014 मध्ये नोंदवण्यात आला होता. त्यांच्या हाताला 14 तर पायाला 14 बोटे होती.