जेजुरी (पुणे) – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून गणला गेलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पहाणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी सॉलिसिटर प्रसाद सुरेशराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे यांच्या सूचनेनुसार पुणे विभागीय धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी तीन वर्षांपूर्वी श्री मार्तंड देवसंस्थानच्या न्यासावर सात जणांची पाच वर्षांकरिता नियुक्ती केली होती. प्रत्येक विश्वस्तांनी नऊ महिन्यांचा कार्यकाळ अध्यक्षपदाचा करावयाचा असे एकमताने ठरविण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 13) विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत संदीप जगताप यांनी प्रमुख विश्वस्तपदाची सूत्रे प्रसाद शिंदे यांना सुपूर्द केली.
यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडेपाटील, तुषार सहाणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, उद्योजक विजय झगडे, डॉ. प्रमोद वाघ, देवसंस्थान अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पुढील काळात शहरातील मारुती, जानाई मंदिरांचा जीर्णोद्धार, गडाच्या आवारात अन्नदान कक्ष, उमाजीराजे नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, राजमाता अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण आदी सुरू असलेली कामे विश्वस्त मंडळ पूर्ण करणार असल्याचे नवनिर्वाचित प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी सांगितले.