पुणे, दि. 31 -नादब्रह्माचा सुरोत्सव, गुरू-शिष्य परंपरेचा अनोखा कलाविष्कार, अध्यात्मिक विचारांची पेर, नंदादीपात उजळून निघालेली सावळी सांज, भक्ती अन् विलोभनीयतेत पाझरणारी कृतज्ञता… अशा भारावलेल्या वातावरणात गुणगान होत होतं ते मायमाऊलींच!
…निमित्त होतं आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याचं. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत सिंहगड रोड येथील स्वामी भक्त परिवार व कलारंग परिवार यांच्या विद्यमाने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्वमूर्तींच्या मातांचा यावेळी सन्मान करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, सिने-नाट्य अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या हस्ते या मातांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये शोभा मोडक, अंजली देशपांडे, हिराबाई निकम, विमल पवार, सुगंधा लोटेकर, निर्मला शिर्के, सुभद्रा गोळे, गजराबाई लोणारी या नऊ मायमाऊलींचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉ. देखणे आणि शिलेदार यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी ज्येष्ठ स्वामीभक्तांच्या हस्ते स्वामींच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर अभय गोखले आणि नम्रता जोशी यांनी गायलेल्या गीतांनी सोहळ्यात भक्तीरसाची उधळण केली. त्यानंतर “सद्गुरू दर्शन’अंतर्गत स्वामी भक्त कलाकारांनी नवनाथांच्या नऊ रुपांचे विलोभनीय दर्शन घडवित, रसिकांना मंत्रमुग्ध केले. गोखले यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. नितीन उत्तरकर आणि सचिन कळंबे यांनी सोहळ्यासाठी योगदान दिले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले.