‘त्या’ उज्ज्वला लाभार्थी महिलेला सिलिंडर झाला परवडेनासा

औरंगाबाद – आयेशा शेख नावाची महिला केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेची आठ कोटी वी लाभार्थि ठरली होती व तिला तसे सर्टिफिकेट देऊन सरकारने तिचा सत्कारही केला होता. पण आता याच महिलेला महागलेला गॅस सिलिंडर खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. आयेशाला सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते आठ कोटी वी लाभार्थी म्हणून सर्टिफिकेट देण्यात आले होते.

आता आयेशा पुन्हा लाकडी चुलीकडे वळली आहे. घरात गॅस असूनही तो महागड्या दरामुळे परवडत नसल्याने तो गॅस वापरणे तिने आता थांबवले आहे, आणि आता ती पुन्हा चुल पेटवूनच स्वयंपाक करू लागली आहे. अशीच अवस्था येथील मंदाबाई पाबळे याहीं महिलेची आहे. ती औरंगाबाद जिल्ह्यातील लोहगावची रहिवासी आहे. तिनेही आपल्याला आता उज्जवला योजनेत मिळालेला गॅस महाग झाल्याने परवडेनासा झाला आहे असे म्हटले असून तिनेही चूल मांडूनच स्वयंपाक सुरू केला आहे.

आयेशा शेख हिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मला माझ्या खोलीचे जितके भाडे द्यावे लागते त्याही पेक्षा गॅस सिलिंडर खरेदी करायला मला जास्त खर्च येत आहे. मी खोलीच्या भाड्यासाठी 600 रूपये देते पण गॅससाठी मला सातशे रूपयांपेक्षा जास्त खर्च येतो.

आम्ही गॅस सिलिंडरसाठी खर्च करीत बसू की अन्य घर खर्चासाठी खर्च करू असा सवाल तिने केला असून इतका महागडा गॅस आम्हीं का खरेदी करायचा असा प्रश्‍नही तिने विचारला आहे. आयेशा ही मोलमजुरी करून घर चालवते. अजंठा गावातील इंदिरानगरची ती रहिवासी आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलींडरच्या दरात गेल्या काहीं दिवसांत सतत वाढ झाली असून हा दर आता 828 रूपयांवर गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.