वेलिंग्टन ता. 19 – न्यूझीलंडचे पंतप्रधान नॉर्मल कर्क म्हणाले, “फ्रान्सने तिसरा अण्वस्त्र स्फोट आज सकाळी मुरुरोआ अटोल येथे केला असे जाहीर करण्याएवढे सबळ कारण आमच्याजवळ आहे. या बातमीबद्दल सर्व न्यूझीलंडवासीय दुःखच व्यक्त करतील.’
मानवजातीविरुद्ध शत्रुत्वाचे कृत्य
टोकियो – पॅसिफिक समुद्रातील मुरुरोआ ऍटोल या बेटावर आज फ्रान्सने जो अणुस्फोट केला त्याचा निषेध जपानच्या अणुस्फोटविरोधी मंडलाने केला आहे. फ्रान्सचे हे कृत्य अखिल मानवजातीविरुद्ध शत्रुत्व करणारे आहे. असले स्फोट आम्ही यापुढे सहन करणार नाही,
असे मंडळाने म्हटले आहे.
काळाबाजार नियंत्रणासाठी स्वतंत्र खाते हवे
लखनौ – खासदार शशी भूषण यांनी असे सुचविले की केंद्र सरकारात काळाबाजार, भेसळ व भ्रष्टाचार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडावे. याशिवाय या काळाबाजारवाल्यांना शासन करण्यासाठी खास जनता कोर्ट स्थापन करावीत व त्यांचे मार्फत त्यांना जरब बसेल अशा शिक्षा ठोठाव्यात अशीही भूषण यांनी सूचना केली आहे.
भारत-बांगला सरहद्दीवर कडक पहारा
कलकत्ता – पश्चिम बंगाल व बांगला देश यांचे दरम्यानच्या सरहद्दीवर उभय सरकारचे सरहद्द संरक्षक पोलीस चोरट्या मालाची होणारी वाहतूक थोपवून धरणार आहे. भारत-बांगला देश या संपूर्ण सरहद्दीवर उभय सरकारांचे पोलीस कडक पहारा ठेवीत आहेत.