सर्व देशांनी समन्वयाने काम करण्याची जागतिक बॅंकेची सूचना
न्यूयॉर्क: करोनामुळे सध्या जगभरात मृत्यूचे तांडव चालू आहे. मात्र, यानंतर जगभरात गरिबीचे थैमान सुरू होणार आहे. यासाठी सर्वांनी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज असल्याची सूचना जागतिक बॅंकेने केली आहे.
जागतिक बॅंकेने केलेल्या प्राथमिक मूल्यांकनानुसार करोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपल्यानंतर जगातील 6 कोटी लोक दारिद्य्राच्या खाईत लोटले जातील. याची गंभीर दखल घेऊन जागतिक बॅंकेने 100 गरीब देशासाठी 160 अब्ज डॉलरची योजना सुरू केली आहे. मात्र, एवढे पुरेसे नाही. इतरांनीही यासाठी समांतर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.
जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मॅलपास पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गेल्या दोन दशकात दारिद्य्र निर्मूलनासाठी केलेल्या कामाला बरेच यश आले होते. मात्र, करोना व्हायरसमुळे यावर पाणी फिरण्याचा प्रकार होणार आहे. करोना व्हायरसचा सर्वांत जास्त परिणाम झालेल्या गरीब देशांना मदत करण्यासाठी जागतिक बॅंकेने तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत. ज्या देशावर याचा जास्त परिणाम होणार आहे, त्यामध्ये आफ्रिकेतील बहुतांश देश आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तान, चांद, पेरू, हैती इत्यादी देशांवरही याचा परिणाम होणार आहे.
या ठिकाणी गरिबांना रोख रक्कम उपलब्ध होण्याची गरज आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. तेथील खासगी क्षेत्राला खेळते भांडवल उपलब्ध करावे लागणार आहे. ज्या देशांना ही मदत उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यातून हे देश औषधांचा पुरवठा करून गरिबांना वाचविण्याचा प्रयत्न करतील.
सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे त्यांनी हा निधी जागतिक बॅंकेच्या माध्यमातून या गरीब देशांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यांना यासाठी आम्ही आमंत्रित करीत आहोत. सध्या या देशांना कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करतानाच जुन्या कर्जाच्या परतफेडीसाठी सवलती देण्याची आवश्यकता आहे. या सवलती उपलब्ध करण्यासाठी आम्ही योगदान करणाऱ्या देशाकडे काही प्रस्ताव पाठविले आहेत.
\याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे खचून न जाता हा व्हायरस संपल्यानंतर गरिबी निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करणे हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे जगात 3 लाख 10 हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे. 48 लाख लोकांना याचा संसर्ग झालेला आहे. अमेरिकेत 15 लाख लोकांना याचा संसर्ग झाला असून मृतांची संख्या 91 हजार 900 वर गेली आहे.