कलंदर : युरेका… 

गणाला चटणीभाकरसुद्धा गळ्याखाली जात नव्हती. कारणही तसे होते. तालुक्‍याच्या ठिकाणचे त्याचे सलून गेले दोन महिने बंद होते. वडील अचानक गेल्यामुळे विसाव्या वर्षीच सलून चालवण्याचे त्याच्या अंगावर आले.

बाकी शिक्षण जास्त नसल्यामुळे इतर काही करणे शक्‍य नव्हते. अलीकडे त्याचा भाचाही त्याला मदत करायला येत होता. तो नुकताच दहावी शिकला होता व एमएससीआयटीही त्याने केले होते. मोबाइल, कॉम्प्युटर चालवण्यात त्याला चांगला रस होता.

गणा भाकर खाऊन आईला सांगून बाहेर पडला. काय करावे काही सुचत नव्हते. कारण एकतर सलून बंद होतेच; पण पुढे सुरू झाल्यावरही किती लोक येतील हा प्रश्‍न होता. अक्षरशः रमतगमत तो वडाच्या पारापाशी गेला. बाजूला तळे होते. आता मे महिन्यात त्यात जेमतेम एका बाजूलाच पाणी होते. पाणी हिरवट झाल्यामुळे कपडे धुवायलाही कुणी येत नव्हते.

गणा पारापाशी वडाला टेकून शून्य नजरेने तळ्याकडे बघत होता. अचानक एक छोटा मासा त्या पाण्यातून उडून बाजूला पडला. तो चिखलावर पडल्यामुळे तिथे तडफडू लागला. उड्या मारून पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला; पण ते जमेना. अगदी पाण्यापासून अर्ध्या फुटावर येऊन पडला. आता हालचाल करेनासा झाला. केवळ तोंड उघडमीट करत होता.

गणालाही वाटले की या माशासारखी आपली परिस्थिती आहे. आता आपला धंदा बंद पडला, पुढे काय होणार? मासा आता फक्‍त मरणाची वाट पाहात होता. इतक्‍यात गावातला दौत्या दोन म्हशींना पाण्यात सोडण्याकरता आला. दोन्ही म्हशी पाण्यात घुसताच धपकन बसल्या. कारण पाणी कमी होते. त्यांच्या त्या बसण्याने तळ्यात एक छोटी लाट आली व पाणी थोडे बाहेर पडले. त्या लाटेमुळे तो मासा पुन्हा पाण्यात पडला व पाण्यात पडताच सराईतपणे खोल पाण्यात निघून गेला.

त्या क्षणी गणा एकदम सावध झाला. जसे आर्किमिडीज “युरेका युरेका’ म्हणतो तसेच त्याला झाले. ती लाट म्हणजे आपल्या भाच्याने दिलेली आयडिया हे त्याला आता पटते.

भाचा म्हणाला होता की, आपण घरी जाऊन लोकांची कटिंग, दाढी करू. त्याबरोबरच होलसेल मार्केटमधून भाजी आणून लोकांची आगाऊ ऑर्डर घेऊन त्यांना घरपोच भाजीचे पॅकेट देऊ. त्याच्याकडे कॉम्प्युटर होता. मोबाइलवरून आपण सगळ्यांची ऑर्डर रात्री 9 पर्यंत घेऊ. दुसऱ्या दिवशी मार्केटमधील भाजी आणून अर्धाअर्धा किलोमध्ये पॅक करून ऑर्डरप्रमाणे प्रत्येकाच्या घरपोच देऊ. किलोमागे दहा ते वीस रुपये सुटू शकतात व तीस ते पन्नासेक किलो भाजी विकली गेली तरी खूप झाले. प्रयत्न तर करून पाहू.

गणाला ती आयडिया आता अक्षरशः लाटेप्रमाणे वाटली. तडक भाच्याला फोन लावून सांगितले की, तू म्हणतो तसे सलून व भाजीचे वेगवेगळे छापील निरोप सर्वांना पाठव. दुपारनंतर घरी ये. आपण तुझी आयडिया प्रत्यक्षात अंमलात आणू. दिशाहीन होऊन वडाच्या पारावर विचार करत बसलेला गणा भराभर वेगाने घराकडे एका निश्‍चयी चालीने गेला… कारण त्याला आज नव्याने जीवन जगण्याचा धडा एक छोटासा मासा देऊन गेला.

– उत्तम पिंगळे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.