दिवाळीमुळे ‘पोस्टमॅन’ची धावाधाव

भेटवस्तू वाटपाचा ताण : अपुऱ्या मनुष्यबळामुळे होतेय कसरत

पिंपरी – कधी सायकलवर तर कधी दिवसभर पायपीट करून नागरिकांपर्यंत दिवाळीची शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू पोहचविण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. अपुरे मनुष्यबळ त्यातच भेटवस्तू, टपाल दिल्यानंतर त्याचे मोबाईलवर स्कॅनिंग करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांसाठी हे काम वेळखाऊ ठरत आहे.

टपाल खात्याच्या पुणे पुर्व विभागामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होतो. यामध्ये पिंपरी-चिंचवडसह खडकी, हडपसर असा पुण्याचा काही भाग देखील येतो. पिंपरी, चिंचवड, प्राधिकरण, चिखली, हिंजवडी, पिंपरी कॉलनी याठिकाणी टपाल कार्यालये आहेत. सुमारे 22 लाख लोकसंख्येच्या शहरासाठी अवघे 136 टपाल कर्मचारी कार्यरत आहेत.

मोबाईल आणि इंटरनेटच्या काळातसुद्धा दिवाळीनिमित्त मित्र आणि नातेवाइकांना भेटवस्तू, शुभेच्छा पत्र पाठविण्यासाठी पोस्टाचे माध्यम वापरले जाते. दैनंदिन काम सांभाळून अतिरिक्त कामाचा ताण या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. यापूर्वी एका पोस्टमॅनला शंभर ते दीडशे पत्रे टाकण्याचे काम होते. परंतु सध्या दिवाळीच्या भेटवस्तू आणि फोन बिले यामुळे त्यांना सहाशे ते सातशे घरी कार्ड वाटपासाठी रोज जावे लागत आहे. शहरातील परिसर मोठा असल्याने व कार्यालयामध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या पोस्टमनांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. परंतु या अतिरिक्त कामाचा मोबदलाही या पोस्टमनला मिळत नसल्याने त्यांच्यावर विनामूल्य अतिरिक्त काम करण्याचा ताण येत आहे. दिवाळी सणाला केवळ लक्ष्मी पूजनाची एकमेव सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळते. त्यामुळे सर्वत्र दीपोत्सवाची धामधूम असताना दुसऱ्याच्या आनंदासाठी टपाल कर्मचारी धावाधाव करीत असल्याचे पहायला मिळत आहे.

निम्मे मनुष्यबळ, कामे मात्र दुप्पट
शहरातील 16 टपाल कार्यालयांमधील स्थिती पाहिली असता निम्म्या मनुष्यबळावर काम सुरु आहे. पत्र व्यवहाराबरोबरच, विविध परवाने, आधारकार्ड, पासपोर्ट (पारपत्र), धनादेश, मुलाखतीचे कॉल, विविध पार्सल नागरिकांपर्यंत टपाल कर्मचाऱ्यांना पोहचवावे लागतात. त्यातच आता घरोघरी जात “आयपीपीबी’चे खाते उघडण्याचे काम टपाल कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर टपाल खाते जबाबदारी पार पडत असताना ऐन दिवाळीतही त्यांना कसरत करत काम करावे लागत आहे.

दिवाळी सणाला भेटवस्तू व भेटकार्ड पाठविण्यासाठी आजही नागरिक मोठ्‌या प्रमाणावर टपाल खात्याचा वापर करतात. त्यामुळे दिवाळी सणाला केवळ लक्ष्मी पूजनाची एकमेव सुट्टी कर्मचाऱ्यांना दिली जाते. वेळेवर दिवाळी भेटवस्तू, शुभेच्छा पत्र पोहचावित यासाठी टपाल कर्मचारी तारेवरची कसरत करीत आहेत. शहरात टपाल कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो.
– डी. आर. देवकर, सचिव, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, पुणे शहर पुर्व विभाग.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.