काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारने कडक निर्बंधांसह मुलींच्या शिक्षणाला परवानगी दिली आहे. मुली विद्यापिठातील शिक्षण घेऊ शकतील. यामध्ये पदव्युत्तर शिक्षणाचाही अंतर्भाव असेल. मुले आणि मुलींचे वर्ग स्वतंत्र भरवले जातील, असे तालिबान सरकारच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.
उच्च शिक्षण मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी मुलींच्या शिक्षणासाठीची मार्गदर्शक तत्वे काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली. विद्यापिठांमध्ये शिकणाऱ्या मुलींना हिजाब परिधान करण्याचे बंधन असणार आहे. मात्र या बरोबर मुलींनी केवळ हेडस्कार्फ घालायचा आहे की चेहराही झाकून घ्यायचा आहे, हे मात्र या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही.
मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिकाच असल्या पाहिजेत असे पूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. जर महिला शिक्षक उपलब्ध झाल्या नाहीत तर चांगल्या चारित्र्याचे आणि वयाने ज्येष्ठ पुरुष शिक्षकही मुलींना शिकवू शकतील, असेही पूर्वी म्हटले गेले आहे.