पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अखेर उशिरा का होईना; पण जाग आलेली आहे. कार्यालयात अस्ताव्यस्त पडलेल्या फायली एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी अभिलेख कक्षाची व्यवस्था भवानी पेठेतील शासकीय उर्दू अध्यापक विद्यालयात करण्यात आलेली आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत नवीन शाळा मान्यता, तुकड्या व दर्जावाढ, विषय मान्यता, सांकेतांक क्रमांक, संच मान्यता, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, वैद्यकीय बिले यासह अन्य विविध प्रकरणे दाखल होत असतात.
या कार्यालयातील जुनी झालेली कपाटे फायलींनी भरली आहेत. आता फायली ठेवण्यासाठीच जागा कमी पडत असल्याने कपाटांवर, जमिनीवर व अन्य ठिकाणी फायली पडल्या आहेत. उंदीर, घूस यांनी काही फायली कुरतडल्या आहेत. जुन्या फायली व अन्य रेकॉर्ड लवकर सापडत नाही. शिक्षक व कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतांची काही महत्त्वाचे रजिस्टरही गायब झालेले आहेत. यामुळे अभिलेख कक्षाची व्यवस्था करायलाच पाहिजे.
याबाबत दैनिक प्रभातच्या ६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या अंकात अभिलेख कक्ष व्यवस्थेसाठी सापडेना मुहूर्त अशा मथळ्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय खडबडून जागे झालेले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी तात्काळ अभिलेख कक्ष सुरू करण्याबाबत अधिकारी यांना आदेश बजाविले. सहायक संचालक डॉ. ज्योती परिहार यांनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, लेखा, आस्थापना शाखा या सर्व शाखाप्रमुखांना लेखी सूचनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्वांना आता कामाला लागावेच लागणार आहे.
कामकाम पूर्णत्वासाठी १५ दिवसांची मुदत
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाशी संबंधित सर्व रेकॉर्डचे अ, ब, क, ड वर्गीकरण करून वर्गीकरण केलेल्या नस्ती यांची भवानी पेठेतील अभिलेख कक्ष या ठिकाणी रेकॉर्ड पाठविण्याची यादी नोंद घेऊन त्याची पोहोच दप्तरी ठेवावी लागणार आहे. कार्यासनाचे सर्व अभिलेख वर्गीकरण करून अभिलेख कक्षात जमा करण्याची जबाबदारी कार्यासन लिपिकाची असणार आहे. हे काम कार्यालयीन कामकाज सांभाळून १५ दिवसांत पूर्ण करून व त्याचा अहवाल विभागप्रमुखांमार्फत सादर करावा लागणार आहे.