सातारा : कराड तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या हवालदार संताजी दादू जाधव याने पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील महिलेशी अश्लिल वर्तन केले होते. त्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्याचे शासकीय सेवेतून निलंबन केले. त्याबाबतचे आदेश आज काढले आहेत.
पोलीस मुख्यालयातून मिळालेली माहिती अशी की, संताजी जाधव याने पोलीस संकुलात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील महिलेशी मनात लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारे वागणूक केली होती. ‘तुमचा मोबाईल नंबर द्या’, ‘गपचुप’, ‘आळशी’, ‘वेडी कुठली’ ‘रामकृष्ण हरि’, ‘हो की नाही कळवा’ या मजकुराच्या चिठ्ठया दिल्या होत्या. यामुळे त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात दि. २२ जुलै रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस खात्याची प्रतिमा अत्यंत मलीन केली, पदास अशोभनिय लांच्छनास्पद गैरवर्तन करुन अत्यंत गंभीर स्वरुपाची कसुरी केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर एसपी सातपुतेंनी शिस्तभंगाची कारवाई केली. जाधव याला शासकीय सेवेतून निलंबित केल्याचे तसेच पोलीस मुख्यालय येथे हजेरी लावण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.
जाधव याने निलंबन कालावधीत कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी व धंदा केल्यास त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार गैरवर्तन केले म्हणून कारवाई करण्याचा इशाराही आदेशात दिला आहे. तेजस्वी सातपुते यांच्या या कारवाईने गैरवर्तणूक करणाऱ्यावर जरब बसली जाणार आहे.