मुंबई- मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने नवऱ्या विरूध्द मारहाणीची तक्रार केल्यानंतर आता घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोनच आठवड्यांपूर्वी तिने सॅम बॉम्बे याच्यासोबत लग्न केले होते.
एका खासगी स्वरूपाच्या समारंभात ते दोघे विवाहबध्द झाले होते व त्यानंतर हनीमूनसाठी गोवा येथे गेले होते. तेथे सॅमने तिला मारहाण केल्यानंतर 29 वर्षीय पूनमने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याची आता 20 हजार रूपयांच्या जामीनावर सुटका केली असून चार दिवस नियमित हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, एका संकेतस्थळाशी बोलताना पूनम म्हणाली की त्याचे वागणे नेहमी असेच होते. मात्र लग्नानंतर त्यात बदल होईल, या आशेवर तिने लग्न केले होते. त्या दिवशीही किरकोळ वादातून त्याने आपल्याला जोरदार मारहाण केली. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी तेथे आले व त्यांनी पोलिसांना बोलावले.
दरम्यान, आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे तिने सांगितले. कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता एखाद्या जनावराप्रमाणे तुम्हाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे परत जाण्यात काही अर्थ नसतो, असे आपल्याला वाटते असेही तिने या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.