राजकारण तर होणारच

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले आणि उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलनाची घोषणा केली. देशाला विशेषतः महाराष्ट्राला सध्या ग्रासून टाकलेल्या करोना महासंकटाच्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारचे राजकारण चुकीचे असल्याचे मत सत्ताधारी पक्षांनी व्यक्‍त केले असले तरी ज्या समाजाचा राजकारण हा अविभाज्य भाग आहे त्या समाजामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी राजकारण होणारच हे आता गृहीत धरावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी या पॅकेजवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका पाहता येथेही राजकारण लपून राहिलेले नाही. याच मुद्द्याचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. करोना महासंकटाचा मुकाबला करण्यास उद्धव ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले असून या सरकारने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या धर्तीवर राज्यातील जनतेसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विरोधी पक्षांसोबत एकही बैठक घेतली नसल्याची जाणीवही फडणवीस यांनी करून दिली आहे. अर्थात, विरोधी पक्ष राजकारण करत आहेत म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करून राज्य सरकारला चालणार नाही. कारण करोनाचा आकडा पाहिल्यास देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक वेळा स्पष्ट सूचना नसल्याने गेल्या काही दिवसांत सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत. मजुरांचे स्थलांतर हा चिंतेचा मुद्दा होऊ लागला आहे. पुणे-मुंबईतील लोक आपापल्या गावी परतू लागल्याने गावाकडचाही धोका वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत राजकारण करू नये, असे म्हणणे बरोबर असले तरी वस्तुस्थितीची जाणीव करून घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अर्थात, केवळ महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्रच करोना महासंकटाच्या पार्श्‍वभूमीवर राजकारण चालू आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीवर केलेली टीका हे याचे ताजे उदाहरण मानावे लागेल. या महासंकटाच्या निमित्ताने चीनला कोंडीत पकडण्याचे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांचे प्रयत्न हेसुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणच मानावे लागणार आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारण हा अविभाज्य भाग असल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करणे आणि सत्ताधाऱ्यांनी आपले समर्थन करताना विरोधकांना उघडे पाडणे ही प्रक्रिया कायमच सुरू असते. त्यामुळे विरोधी पक्ष राजकारण करत आहेत, असे म्हणून आपल्या कामाकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही सत्ताधारी पक्षाला परवडणार नाही.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वीस लाख कोटींच्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे आणि या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली आहे. फडणवीस यांच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्येसुद्धा हेच राजकारण आहे आणि शरद पवार यांनी अशाच प्रकारचे पत्र उद्धव ठाकरे यांना लिहावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभारावर टीका करणे म्हणजे राजकारण नव्हे, पण राज्यातील उद्धव ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करणे म्हणजे राजकारण हा आक्षेप फडणवीस यांना मान्य नाही असे त्यांच्या शब्दातून प्रतीत होते. देशाने किंवा महाराष्ट्राने यापूर्वी जेव्हा-जेव्हा अशाच प्रकारच्या संकटांचा सामना केला तेव्हा तेव्हाही राजकारण झालेच होते.

90च्या दशकातील मुंबईतील दंगली असोत वा बॉम्बस्फोट असो किंवा 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेला हल्ला असो किंवा किल्लारी भूकंपासारखे अगदी नैसर्गिक आपत्ती असो दरवेळी या संकटांना राजकारणाची किनारही होतीच. त्यामुळे सध्याचे महासंकट त्याला अपवाद असणार नाही हे गृहीत धरावे लागेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेते जर टीका करत असतील आणि त्या टीकेमध्ये काही तथ्य असेल तर ते तथ्य स्वीकारून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्रात सुदैवाने विविध राजकीय पक्षांचे मोठे अनुभवी नेते सल्लामसलतसाठी आणि मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण अधूनमधून काही भावना व्यक्‍त करत असतात. त्या सर्वच भावना सरकारला सुखावणाऱ्या असतात, असे नाही. पण एखादी समस्या मांडण्याची तळमळ त्यातून समोर येते.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला सावरण्याचा मोठा अनुभव आहे. किल्लारीमधील भूकंप असो किंवा 90च्या दशकातील मुंबईतील दंगली आणि बॉम्बस्फोट असो शरद पवार यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राला सावरले होते. त्यांचे मार्गदर्शन घेणे सध्याच्या सरकारला सहज शक्‍य आहे. देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही संकटाच्या काळामध्ये शरद पवार यांच्यावरच विश्‍वास दाखवला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी राजकारण टाळता येणार नसले तरी सर्वच राजकीय पक्षांचे सहकार्य घेऊन या संकटावर मात करण्याचा मुत्सद्दीपणा दाखवता येऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण करू नये ही अपेक्षा आदर्श असली तरी ती प्रत्यक्षात येणे अजिबात शक्‍य नसल्याने राजकारण होणारच हे गृहीत धरूनच सरकारला वाटचाल करावी लागणार आहे.

केंद्रातील मोदी सरकार असो किंवा महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार असो विरोधी पक्षांच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून या संकटातून मार्ग काढणे या एकाच उद्दिष्टाने सरकारचा गाडा हाकण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात केलेल्या भाषणामध्ये राजकारण करायचे तेव्हा राजकारण करू अशा प्रकारचे भाष्य केले असले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणालाही राजकारण टाळता येणार नाही हे उद्धव ठाकरे यांनीही आता लक्षात घ्यायला हवे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.