दारू विक्रीतून राजकारणी गब्बर

शिरूर तालुक्‍यातील अनेक हॉटेल्स, विनापरवाना अनेक धाबे, हॉटेल्समध्ये खुलेआम देशी- विदेशी दारू विक्री होत आहे. यावर कुणाचे नियंत्रण नाही. नियंत्रण असणारी सर्वच खाती महिन्याला येणाऱ्या पाकिटातील आतले खात आहेत. एकीकडे तालुक्‍यात पूर्णपणे दारूबंदी व्हावी म्हणून आंदोलन झाले. दुसरीकडे पोलिसांच्या वरदहस्तामुळे खुलेआम दारू विक्री सुरू आहे.

शिरूर तालुक्‍यात पुणे- नगर महामार्ग असो वा अंतर्गत रस्ते. प्रत्येक गावांत जाणाऱ्या रस्त्यांवर अर्धा किमीच्या आत हॉटेल, धाबे आहेत. परंतु याआडून खुलेआम दारू व्यवसाय सुरू आहे. या हॉटेल्सला परवाना नसून विना परवाना हे व्यवसाय सुरू आहेत. तालुक्‍यात ना परवाना सुमारे ऐंशी टक्‍के हॉटेल, धाबे व्यवसाय करणाऱ्यांकडे नाहीत. ग्रामपंचायत, नगर परिषद यांचा परवाना नाही. खुलेआम विना परवाना चालणाऱ्या व्यवसायधारकांवर शासनाचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर हे हॉटेल आहे का दारूचा गुत्ता हे कळत नाही. सर्व हॉटेलमध्ये विना परवाना दारू व्यवसाय सुरू आहे. हे हॉटेल रात्री अकरानंतर बंद असायला हवे. परंतु यावर कुणाचे नियंत्रण नसल्याने रात्र दिवस सुरू असल्याचे दिसून येत आहेत. यातील अनेक हॉटेल राजकीय नेते, पुढारी यांचे असल्याने याकडे सर्वच खाते दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायतीचे नियंत्रण सुटले असल्यामुळे हा अवैद्य धंदा बोकाळला आहे.

हॉटेल, धाबे यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची गरज आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सर्वच हॉटेलमध्ये देशी विदेशी दारू विक्रीचे माहेरघर आहे. या भागात बनावट दारूही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हे हॉटेल्स मालक हे राजकीय पुढारी, औद्योगिक वसाहतील भाई लोकांचे आहेत. त्यामुळे पोलीस खाते आणि दारू माफियांची छुपी युती तरूण पिढी बरबाद करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.