विकास कामांच्या उद्‌घाटनांची लगीनघाई

158 कोटी रुपयांची कामे : विधानसभा निवडणुकीसाठी मशागत सुरू

अत्याधुनिक मैलाशुद्धीकरण केंद्रांची बांधणी
महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत शहरातील मैलामिश्रीत पाण्याचा निचरा होण्यासाठी 73 कोटी रुपयांचा निधी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नाने भुयारी गटार योजनेसाठी मंजूर झाले आहे. यामुळे शहरांतील भुयारी गटारांची व्यवस्था होणार आहे. यासाठी संपूर्ण शहरामध्ये भुयारी पाईपलाईनद्वारे सांडपाणी जमा केले जाणार आहे. यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे. याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मैलाशुद्धीकरण केंद्र बांधली जाणार आहेत. या योजनेमुळे पाणी प्रदूषणावर नियंत्रण होणार असून पर्यावरण समतोल राखण्यास मदत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे  – लोकसभा निवडणुकीची धामधूम संपत नाही तोच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय मशागत सुरू झाली असून तळेगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील 158 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रविवार (दि. 30) पार पडणार आहे.

रेल्वे भुयारी पुलाचे, जैव विविधता उद्यानाचे, व्यापारी संकुलाचे, पाणी पुरवठा आदी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे व राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळला बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मिळालेले मंत्री पद तसेच खासदार श्रीरंग बारणे यांना सलग दुसऱ्यांदा झालेला विजय यामुळे भाजप-शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीतही युतीला घवघवीत यश मिळवून देण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यादृष्टीने विकास कामांचे उद्‌घाटन व भूमिपूजनांचा धडाका लावला आहे.

तळेगाव दाभाडे स्टेशन चौकातील तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी म्हणून जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत 10 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीतून रेल्वे भुयारी पूल तयार करण्यात आला आहे. गेली अनेक महिने हा पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत होता. तळेगावकरांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. रविवारी त्याचे लोकार्पण होत असल्याने तळेगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. याखेरीज यशवंत नगर येथे वैशिष्ट्‌यपूर्ण योजनेंतर्गत 10 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीतून जैवविविधता उद्यानाचे भूमिपूजन होणार आहे. याद्वारे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याने कौतुक
होत आहे.

वैशिष्ट्‌यपूर्ण योजनेंतर्गत तळेगाव दाभाडे शहरांमध्ये मारुती मंदिर चौक व जिजामाता चौक या मोक्‍याच्या व वर्दळीच्या ठिकाणी व्यापारी संकुलाचे गाळे उभारण्यात आले असून मारुती मंदिर चौकाजवळ 10 कोटी रुपयांच्या निधीतून 78 व्यापारी गाळे तर जिजामाता चौकात 2 कोटी 52 लक्ष रुपयांच्या निधीतून 44 व्यापारी गाळे व्यापारी उभारण्यात आले आहेत. या व्यापारी संकुलामुळे शहरात उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे. शहरातील पाणीपुरवठ्याची योजना अद्ययावत करण्यासाठी 52 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत मंजूर झाले असून या कामाला सुरुवात होत आहे. शहरातील सर्वदूर मुबलक तसेच सुरळीत व नियमित पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.