शिक्रापूर व लोणीकंद पोलीस हद्दीत बंदोबस्त
शांतता राखण्याचे सर्व स्तरांतून आवाहन
पुणे/ शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे 2018 मध्ये झालेल्या दंगलीनंतर 1 जानेवारी 2019 रोजी ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला होता. त्याच पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2020चा कार्यक्रमही शांततेत पार पडण्यासाठी सोमवार (दि. 30) पासूनच शिक्रापूर व लोणीकंद पोलीस हद्दीत म्हणजेच कोरेगाव भीमा परिसरात तब्बल पंधरापट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजयस्तंभ मानवंदना शांततेत पार पडणार आहे.
यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह भौतिक सुविधांकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. त्यात प्रामुख्याने सुरक्षेबद्दलही पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक बंद
दि. 1 जानेवारी 2020 रोजी पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पेरणे येथील टोलनाका ते शिक्रापूरदरम्यान बंद राहणार आहे. मानवंदनेसाठी येणाऱ्या नागरिकांची पार्किंगच्या ठिकाणी डीएफएमडीच्या साहाय्याने तपासणी करण्यात येणार असून याठिकाणाहून 250 पेक्षा अधिक पीएमपी बसेसच्या सहाय्याने मानवंदनेसाठी विजयस्तंभ परिसरात नेण्यात येणार आहे. 31 डिसेंबरनंतर शिक्रापूर-कोरेगाव भीमा, लोणीकंद रस्त्यावरील वाहतूक पीएमपीएलच्या बस व्यतिरिक्त पूर्णपणे बंद राहणार आहे.
स्थानिक करणार स्वागत
परिसरात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दलाने दोन महिन्यांत स्थानिक व्यापारी तसेच ग्रामस्थांच्या 200 पेक्षा जास्त बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमुळे स्थानिकांतही बंधुत्वाची भावना जागृत झाली आहे. स्थानिक पदाधिकारी, व्यापारी तसेच नागरिकांकडून मानवंदनेसाठी येणाऱ्या बांधवांचे स्वागत पाणी व फुले देऊन केले जाणार आहे.
या भागात इंटरनेट सेवेवर प्रतिबंध
कोरेगाव भीमा, विजय स्तंभ परिसरासह लोणीकंद, पेरणे, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात दि. 1 जानेवारीला इंटरनेट सेवेवर प्रतिबंध येणार असल्याने या भागात जॅमर लावण्यात येणार आहेत. विजय स्तंभ परिसरात मोबाइल इंटरनेट सेवेवर प्रतिबंध असला तरी पोलिसांच्या संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्यक साधने आहेत.
सोशल मीडियावर अंकुश व फ्लेक्स बंदी
कोरेगाव भीमा व परिसरात कोठेही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्यास आणि या भागात कोठेही सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, तसेच 2 जानेवारीपर्यंत कोणतेही फ्लेक्स लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.