बेल्हे (पुणे) – साकोरी (ता. जुन्नर) येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचे प्रधानमंत्री (पीएम) किसान सन्मान योजनेचे एकूण 8 हजार रुपये चुकून उस्मानाबाद येथील मयूर मोटे यांच्या बॅंक खात्यावर जमा झाले होते. मोटे यांनी इमानदारीने पैसे संबंधित शेतकऱ्याला प्रत्यक्ष घरी येऊन मंगळवारी (दि. 1) परत केले.
साकोरी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुळे यांनी येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचे पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत नसल्याचे, बेल्हे येथील महा ई सेवा केंद्राचे सुनिल विश्वासराव यांना सांगितले. यावेळी विश्वासराव यांनी संबंधित बॅंकेशी संपर्क साधून चौकशी केली असता, हे पैसे उस्मानाबाद येथील मयूर मोटे यांच्या बॅंक खात्यावर जमा होत असल्याचे निदर्शनास आले. विश्वासराव यांनी उस्मानाबादचे मयूर मोटे यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.
त्यावेळी मोटे यांना आपल्या बॅंक खात्यावर दुसऱ्या शेतकऱ्याचे पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे चुकून जमा होत असल्याचे निदर्शनास आले.
मोटे यांनी साकोरी (ता. जुन्नर) येथे संबंधित वृद्ध शेतकऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन चुकून बॅंक खात्यावर जमा झालेले सर्व पैसे संबंधित शेतकऱ्याकडे सुपूर्द केले. यावेळी संबंधित वृद्ध शेतकऱ्याचा चेहरा आनंदाने फुलला. यावेळी साकोरी ग्रामस्थांच्या वतीने मोटे यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच सुनील विश्वासराव व गणेश चोरे यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
- बेल्ह्यातही घडली होती अशीच घटना
दरम्यान, बेल्हे येथील एका शेतकऱ्याचे पीएम किसान सन्मान योजनेचे 6 हजार रुपये, येथील एक तमाशा कलावंत बुढन बेपारी यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेले होते. गेल्या आठवडाभरापूर्वी त्या तमाशा कलावंताने संबंधित शेतकऱ्याचे पैसे त्यास प्रामाणिकपणे परत केले. त्यावेळी बेल्हे ग्रामस्थांच्या वतीने संबंधित तमाशा कलावंताचा सत्कार करण्यात आला होता.