नवी दिल्ली – कर्नाटकात सत्ताविरोधी लाटेचा सामना करीत असलेल्या भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 प्रचार सभा घेतल्या जाणार आहेत. भाजप ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि बी. एस. येडियुरप्पा यांचा चेहऱ्यावर लढणार आहे. भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने कर्नाटकातील दलितांतील मडिगा आणि वोक्कलिंगा समुदायाची मते मिळविण्यासाठी एक खास रणनिती तयार केली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारने अलिकडेच दलितांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची सीमा 15 टक्क्यांहून 17 टक्के केली आहे. ही टक्केवारी वाढविल्यानंतर अंतर्गत विभाजण केले होते. याचा सर्वाधिक लाभ मडिगा समुदायाला होणार आहे. कर्नाटकात 17 टक्के एकूण दलित असून त्यात सहा टक्के मडिगा आहे.
भाजपने राज्यात सरकार स्थापन केल्यापासूनच पक्ष संघटना आणि मंत्रालयात वोक्कलिंगा समुदायाला प्राधान्य देण्यास सुरवात केली होती. कर्नाटकातील दलितांना कॉंग्रेसची व्होटबॅंक, तर वोक्कलिंगा समुदायाला संयुक्त जनता दलाची व्होटबॅंक मानली जाते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 प्रचार सभा घेतल्या जाणार असून शेवटचे तीन दिवस ते कर्नाटक तंबू गाडून राहणार असल्याचे समजते. याशिवाय, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या 50 सभा घेतल्या जाणार आहेत.
गुजरातमध्ये ज्या पध्दतीने विजय मिळविण्यात आला होता त्याच पध्दतीचा उपयोग कर्नाटकात केला जाणार आहे. गुजरातप्रमाणे कर्नाटकच्या प्रचारात देशातील सर्व मोठ्या नेत्यांना उतरविले जाणार आहे. यात सर्व केंद्रीय मंत्र्यासह देशातील 50-60 नेते याची तयारी करीत आहेत. भाजपने 224 पैकी 115 जागांवर आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे, हेही उल्लेखनीय.
महत्वाचे म्हणजे, कॉग्रेस आणि जेडीएसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतरही भाजप घाईगडबडीत दिसून येत नाही आहे. उमेदवारी देताना जातीय समीकरण, अंतर्गत सर्वेक्षण रिपोर्ट आणि स्थानिक मुद्यांचा विचार करणार आहे.