नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाने भारताला 29 पुरातन वस्तु सुपूर्द केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून भारताला ही भेट मिळाली आहे.
यात अनेक प्राचीन मुर्तीही आहेत. शिव आणि त्यांचे शिष्य, भगवान विष्णू आणि त्यांची रूपे अशा स्वरूपाच्या या मुर्ती असून त्यात जैन परंपरेतील चित्रे आणि सजावटीच्या वस्तुंचाही समावेश आहे. या पुरातन वस्तु वेगवेगळ्या कालखंडातील आहेत.
वाळूचा खडक, संगमरवर, कांस्य, पितळ, कागद अशा सामग्रीत या मुर्ती आणि चित्रे आहेत. या पुरातन वस्तु राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या या वस्तुंची पहाणी केली.
परत मिळालेल्या इतर पुरातन वास्तूंमध्ये महाराजा सर किशन पर्शाद यामीन लाला दीनदयाल यांचे चित्र, हिरालाल ए. गांधी यांचे पोर्ट्रेट आणि ‘मनोरथ’ पोर्ट्रेट यांचाही समावेश आहे. या पुरातन वस्तु चोरट्या मार्गाने देशाबाहेर गेल्या होत्या.