पवन मावळ, (वार्ताहर) – पवना धरणात बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फांगणे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. मयांक उपाध्याय (वय २७, सध्या रा. हिंजवडी फेज १, मुळ, हरियाणा) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो हिंजवडी येथील खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील चार मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यापैकी दोघे पाण्याच्या बाजूला गेले असता पाय घसरुन पाण्यामध्ये पडले. त्यामधील एक जण पाण्यातून बाहेर पडण्यास यशस्वी झाला. मात्र, मयांक उपाध्याय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल विजय गाले, पोलीस कर्मचारी जय पवार, नितीन कडाळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अवघ्या अर्धा ते पाऊण तासात मयांकचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मृत मयांक नातेवाईकांना देण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.