योगिता जगदाळे
जीवनातील इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणे मैदानी खेळांतही महिलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला अमीट ठसा उमटवला आहे. विशेषत: क्रिकेट आणि बॅडमिंटन आणि लॉन टेनिसमध्ये तर भारतीय महिलांनी अत्युच्च पातळी गाठली आहे. टेनिसमध्ये सानिया मिर्झा, बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी मोठ्या प्रमाणावर टेनिस आणि बॅडमिंटनकडे महिला खेळाडूंना आकर्षित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर महिला क्रिकेतपटूंनी फार पूर्वीपासून आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच मर्यादित षटकांच्या एक दिवशीय आणि टी-20 सामन्यातही पुरुषांच्या बरोबरीचे आक्रमक क्रिकेट खेळताना आज महिला क्रिकेटपटू दिसत आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच क्षेत्रात त्यांच्या बरोबरीने वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करत आहेत. पूर्वीच्या शांता रंगास्वामी, डायना एदलजी, शुभांगी कुलकर्णी, अंजुम चोप्रा, झुलन गोस्वामी यांच्यापासून ते आजच्या मिताली राज, स्मृती मंधान, हरमनप्रीत कौरपर्यंत अनेक भारतीय महिला क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपला अमीट ठसा उमटवला आहे. महिला क्रिकेटला अगदी तळागाळापर्यंत, खेडोपाडी पोहोचवले आहे.
एकूण आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतीय पातळीवरही क्रिकेटच्या मैदानावरील विक्रमांबरोबर मैदानाबाहेरही समालोचक, तज्ज्ञ म्हणूनही महिलांचे अस्तित्व चांगलेच जाणवत आहे. महिलांसाठी क्रिकेटमधील एक क्षेत्र बाकी होते, अंपायर्सचे आणि सामना अधिकाऱ्यांचे-ते ही आता महिला क्रिकेटपटूंनी पादाक्रांत करायला सुरुवात केली आहे. त्याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भारताच्या जीएस लक्ष्मी यांची सामना अधिकारी (मॅच रेफरी) म्हणून झालीली नियुक्ती.
कसोटी सामना असो वा मर्यादित षटकांचा आंतरराष्ट्रीय सामना, वा टी-20 सामना. त्यात अंपायरइतकेच, किंबहुना काहीसे अधिकच महत्त्व सामना अधिकारी-मॅच रेफरीला असर्ते. आजवर सामना अधिकाऱ्यांची मक्तेदारी केवळ पुरुषांकडेच होती. मात्र नुकताच भारताच्या जीएस लक्ष्मी यांनी त्या मक्तेदारीला शह देत त्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्या पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला मॅच रेफरी बनल्या आहेत. जीएस लक्ष्मी यांना 14 मे, 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच रेफरीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलवर पहिल्या महिला रेफरी म्हणून नियुक्त केले आहे. जीएस लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय सामना अधिकारी म्हणून करण्यात आलेली ही नियुक्ती एकूण महिलावर्गाला आणि विशेषकरून भारतीय महिलांना अभिमानाची बाब आहे.
उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मी आऊटस्विंग करणाऱ्या गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होत्या. 1986 ते 2004 या कालावधीत त्यांनी भारतीय संघासह साऊथ सेंट्रल रेल्वे, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व विभाग, दक्षिण विभाग अशा संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.
आता आंतरराष्ट्रीय पॅनलवर झालेल्या नियुक्तीनंतर 51 वर्षीय जीएस लक्ष्मी आंतरराष्ट्रीय सामन्यांत तात्काळ प्रभावाने आपला कार्यभार सांभाळणार आहेत. जीएस लक्ष्मी आता महिला क्रिकेटच्या बरोबरीने पुरुषांच्या सामन्यासाठीही मॅचरेफरी म्हणून काम करतील. एक योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्लेयर पोलोसॅक यांची पुरुषांच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथम महिला अंपायर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर एका महिन्यातच जीएस लक्ष्मीची सामना अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आता आयसीसी पॅनेलमधील महिलांची संख्या 8 झाली आहे. क्लेअर यांच्या बरोबरीने इलोइस शेरीदान आता महिला तसंच पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंग करताना दिसतील. लौरन एगनबर्ग, किम कॉटन, शिवानी मिश्रा, स्यू रेडफर्न, मेरी वॉल्ड्रन आणि जॅक्वेलिन विल्यम्स या पॅनेलमधील अन्य महिला अंपायर्स आहेत.
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू कॅथी क्रॉस या आयसीसीच्या अंपायर्स पॅनेलमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिला महिला अंपायर होत्या. जानेवारी 2014 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय अंपायर पॅनलवर नियुक्ती झाली होती. आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमधून त्या गेल्या वर्षी निवृत्त झाल्या. महिला विश्वचषक 2009 आणि 2013 मध्ये त्यांनी अंपायर म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
आयसीसीच्या मॅचरेफरी पॅनेलमध्ये नियुक्ती होणं हा माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान आहे. माझ्या नियुक्तीमुळे अन्य महिला मॅचरेफरींना प्रोत्साहन मिळेल. एक खेळाडू म्हणून क्रिकेटमधील प्रदीर्घ कारकिर्दीनंतर मॅचरेफरी म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना या अनुभवासह जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न असेल,” असं लक्ष्मी यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सामना अधिकारी, म्हणजेच मॅचरेफरी खेळाच्या क्षेत्रापासून दूर राहतो. प्रत्यक्ष खेळात त्याचा सहभाग काहीही नसतो. तो प्रेक्षकांच्या दृष्टीने इव्हेंटचे निरीक्षण करतो. सामना अधिकारी म्हणजे मॅच रेफरी खेळाच्या खेळाच्या किंवा परिणामाच्या कोणत्याही प्रासंगिकतेबाबत कोणताही निर्णय घेत नाही; नियुक्त अंपायरांची ही जबाबदारी आहे. क्रिकेट संहिताच्या होणाऱ्या कोणत्याही उल्लंघनाचा आढावा घेण्यासाठी आणि कोणत्याही उल्लंघनासाठी दंड ठोठावण्याचे काम सामना अधिकारी करतो. आयसीसी क्रिकेट आचारसंहितेचे खेळादरम्यान पालन केले जाते यावर देखरेख करण्याचे काम पाहणे, त्याची खात्री करणे ही मॅचरेफरीची-सामना अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. झालेल्या प्रत्येक क्रिकेट सामन्यानंतर, सामना रेफरी आयसीसीला आचारसंहितेच्या अटी किंवा क्रिकेटच्या नियमांबाबत कोणताही खेळाडू किंवा अंपायरांद्वारे झालेल्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेची आणि त्याबाब्तच्या कारवाईची नोंद करून आयसीसीला एक अहवाल सादर करतो.