- कृषी विभागाचा उपक्रम
देहूरोड – मावळ तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील व हवेलीतील किन्हई येथे प्रथमच सगुणा पर्पल वाणाच्या लाल भात पीक लागवडीचा प्रयोग एका शेतकऱ्याच्या शेतजमिनीत कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवेली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः सहभाग घेत भातलागवड केली आहे.
मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात भात पीक घेण्यात येते. आंबेमोहोर भात उत्पादन झपाट्याने कमी झाल्यानंतर दोडकी भाताचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. फुले समृद्धी व इंद्रायणी वाणाचे उत्पादन मावळात मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार भात पीक उत्पादन ठरते.
आरोग्यासाठी पौष्टीक असलेल्या लाल तांदळाला बाजारात जास्त दर मिळत असला, तरी लाल भात पिकवणे अतिशय अवघड असल्याने शेतकरी लागवड करीत नव्हते. मात्र, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने सगुणा पर्पल वाणाचे प्रथमच भातपीक घेण्यात येत असून, हवेली कृषी विभागाने किन्हई येथील शेतकरी अरुण भुंडे यांच्या शेत जमिनीतील एका भागात लाल भात रोपांची लागवड चारसूत्री पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे.
भात लागवडीसाठी हवेली कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या रेश्मा शिंदे यांच्यासह कृषी पर्यवेक्षिका मनीषा पावडे, सहायक कृषी अधिकारी मनीषा शिरसाट यांनी स्वतः शेतकरी महिलांसमवेत सहभाग घेत भात खाचरात भातलागवड केली.