पुणे – बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला खंडणीविरोधी पथकाने वानवडी भागात पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
मल्लेश सारंग वेलायधन (वय २५, रा. प्राची अपार्टमेंट, श्रीवस्तीनगर, घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
खंडणीविरोधी पथकातील कर्मचारी वानवडीतील फातिमानगर भागात गस्त घालत होते. त्या वेळी वेलायधन एका उपाहारगृहाजवळ थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे यांना मिळाली.
सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, अमोल पिलाणे आदींनी ही कारवाई केली.