- राज्य सरकार, भारतीय पोर्ट रेल आणि रोपवे महामंडळात करार
पिंपरी – ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मावळ तालुक्यातील कार्ला येथील श्री एकवीरादेवी मंदिर येथे रोपवे उभारण्यात येणार आहे. रोपवे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सुसाह्यता अहवाल तयार करणे, निविदा व्यवस्थापन प्रक्रिया राबविणे यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळ (आयपीआरसीएल) यांच्यात पर्यटन संचालनालयाचा (डीओटी) सामंजस्य करार करण्यात आला. त्याचबरोबर राज्यातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (एमसीडीसी) यांच्यासमवेतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.
हा रोपवे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाचे संचालक अनिलकुमार गुप्ता, सहकारी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे उपस्थित होते.
या वेळी पर्यटनमंत्री ठाकरे म्हणाले, हे दोन्ही सामंजस्य करार राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहेत. एकवीरा देवी मंदिर हे ठिकाण राज्याचे भक्तीपीठ आहे. तसेच कार्ला लेणी आहे. याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. आज झालेल्या करारानुसार भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पूर्तता करून पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारामुळे राज्यातील कृषी पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.