विज्ञानविश्‍व : नीरव शांतता

डॉ. मेघश्री दळवी

आपण ध्वनिप्रदूषणाबाबत बोलत असतो, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाविषयी तक्रार करत असतो. कुठेतरी शांतता मिळेल या आशेने अनवट वाटा धुंडाळत असतो. विज्ञान-तंत्रज्ञानातल्या संशोधनालाही अशा शांततेची गरज असते. साधं उदाहरण म्हणजे ध्वनीशास्त्रातले प्रयोग. म्हणूनच अनेक ठिकाणी अतिशांत अशा क्‍वाएट रूम प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत. अशा खोलीत कोणताही प्रतिध्वनी येत नसल्याने तिला प्रतिध्वनीविरहित (अनएकोइक) खोली देखील म्हटलं जातं.

त्यातली सर्वाधिक शांत जागा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंदलेली क्‍वाएट रूम आहे मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात. अमेरिकेतलं रेडमंड इथल्या बिल्डिंग 87 च्या तळघरात मायक्रोसॉफ्टची हार्डवेअर लॅब आहे. एक्‍सबॉक्‍स, होलोलेन्स, सरफेस कम्प्युटर्स अशा अत्याधुनिक प्रॉडक्‍ट्‌सवर तिथे संशोधन होत असतं. तिथेच ही शांत खोली बनवलेली आहे.
आवाजाची तीव्रता मोजणारी डेसिबेल मापनपद्धती पटींमध्ये असते. त्यामुळे डेसिबेल दहाने वाढले की तीव्रता प्रत्यक्षात दसपट होते. या मापनपद्धतीत हवीशी वाटणारी शांतता 40 डेसिबेल इतकी असते, कुजबुजीची तीव्रता 30 डेसिबेल असते, तर श्‍वासाच्या मंद आवाजाची केवळ 10 डेसिबेल.

गंमत म्हणजे आपण ऐकू शकलो नाही तरी शून्य डेसिबेलच्या खालच्या आवाजाची तीव्रता वेगवेगळ्या यंत्रांच्या सहाय्याने मोजता येते. 2015 मध्ये तयार झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या क्‍वाएट रूममध्ये सभोवतालच्या आवाजाची तीव्रता उणे 20 डेसिबेल इतकी अत्यल्प आहे.
बाहेरचा आवाज आत येऊ नये म्हणून या खोलीला एक फूट जाडीच्या कॉंक्रीट भिंतींचे सहा थर आहेत. 21 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेल्या या घनाकृती खोलीच्या आतल्या पृष्ठभागांवर खास ध्वनिशोषक पट्ट्या बसवलेल्या आहेत.

त्यामुळे बाहेर कितीही कोलाहल असला तरी आत एक नीरव शांतता असते. चिमुकल्या इलेक्‍ट्रॉनिक घटकांमधून किती आवाज बाहेर पडतो, इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणांमधल्या फॅनचा आवाज किती, कीबोर्डचा आवाज किती, अशा सूक्ष्म पातळीवरचं मापन इथे होतं. उच्च दर्जाचे मायक्रोफोन आणि स्पीकर यांच्या चाचण्या होतात. बोललेल्या सूचना ऐकून काम करणारी कोर्टाना ही मायक्रोसॉफ्टची ऍलेक्‍सासारखी यंत्रणा आहे. तिला ट्रेन करण्यासाठीदेखील या खोलीचा वापर होतो.

इतकी शांतता मात्र माणसांना सोसत नाही. या जबरदस्त सन्नाट्यामध्ये हृदयाची धडधड, पोटातले आवाज, श्‍वास-उच्छ्वास, फुफ्फुसाचं आकुंचन-प्रसरण, सांध्यांच्या हालचाली यांचे आवाज सतत कानी पडत राहतात. त्याने जीव नकोसा होतो आणि कधी एकदा या खोलीबाहेर पडतो असं होऊन जातं! शरीराचा तोल राखताना आपला मेंदू आजूबाजूच्या आवाजांचा संदर्भ घेत असतो. पण अशा अतिशांत खोलीत संदर्भ न मिळाल्याने शरीराचा तोल सांभाळणं अत्यंत कठीण होतं.

त्यामुळे ही मायक्रोसॉफ्टची उणे 20 डेसिबेलची खोली म्हणा की याआधी गिनीज रेकॉर्ड असलेली ऑरफिल्ड लॅब्समधली उणे नऊ डेसिबेलची – अशा खास क्‍वाएट रूम्स केवळ प्रयोगांपुरत्याच वापरल्या जातात हे वेगळं सांगायला नको!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.