- नव्या 627 रुग्णांची भर; 14 जणांचा दिवसभरात मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांचा आकडा एका बाजूला कमी होत असताना आता मृतांचा आकडाही काही प्रमाणात का होईना कमी होऊ लागला आहे. गेल्या चोवीस तासांत शहरतील 9 तर शहराबाहेरील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नव्या 627 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 82 हजार 503 इतका झाला आहे.
बुधवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (गुरुवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 561 जणांना करोनाची लागण झाली असून, शहराबाहेरील 66 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर गेल्या 24 तासांत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 9 जण शहरातील असून 5 जण शहराबाहेरील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 1405 वर पोहोचला असून, शहराबाहेरील 542 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूच्या आकड्याने 1947 ची संख्या आज गाठली.
गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील चिंचवडगाव, काळेवाडी, निगडी, पिंपळे सौदागर, वाकड, दिघी, पिंपळेगुरव, पिंपरी येथील 9 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील सातारा, कुरकुंडी, खेड, पुणे व पंढरपूर येथील 5 जणांचा समावेश आहे.
आतापर्यंत शहरातील 76 हजार 763 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 5460 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 713 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या दोन दिवसांतील 1078 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 3222 जण महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 2761 आणि शहराबाहेरील 436 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.