पिंपरी – पिंपरी- चिंचवड महापालिकेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कक्ष (सीएसआर सेल) स्थापन केला आहे. त्यासाठी दोन अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने मानधनावर नियुक्त केले जात होती. मात्र, आता या नियुक्त्या खासगी एजन्सीमार्फत केल्या जाणार आहेत.
सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, शाळा तसेच इतर प्रकल्पांसाठी शहरातील खासगी कंपन्यांकडून सीएसआर निधीतून महापालिका सहाय्य घेते. या सीएसआर कक्षासाठी पालिकेने दोन अधिकारी नेमले होते. त्याची प्रत्येक सहा महिने कालावधीसाठी नियुक्ती केली जात होती. त्या दोन अधिकाऱ्यांना महापालिकेकडून सतत मुदतवाढ दिली जात होती. सहा महिन्यांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता आता पुरवठादार एजन्सीमार्फत हे अधिकारी नेमण्याचा निर्णय
महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने घेतला आहे. तीन वर्षे कालावधीसाठी पहिल्या वर्षी दरमहा 93 हजार मानधन दिले जाणार आहे. त्यानंतर दरवर्षी दरमहा 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. या 36 लाख 93 हजार 960 रुपये खर्चासाठी राबवलेल्या निविदाप्रक्रियेत तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यातील दोन निविदा पात्र ठरल्या. सोशिओ इन्फिनिटीची निविदा पात्र ठरली. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.