- 399 आढळले पॉझिटिव्ह; 1314 पथके कार्यान्वित
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरू आहे. त्यासाठी महापालिकेची 1314 पथके कार्यान्वित केली असून पथकांच्या माध्यमातून आजपर्यंत शहरातील 20 लाख 65 हजार 238 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 399 नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
करोनाबाधित रुग्णांची संख्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये झपाट्याने वाढली होती. त्यामुळे राज्यस्तरावर “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत पालिकेमार्फत कार्यान्वित केलेले स्वंयसेवकांचे पथक प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा अशा व्याधींची माहिती घेतले जाते. तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तापमान व प्राणवायूची तपासणी केली जाते. प्रत्येक घराचे दोन वेळा सर्वेक्षण केले जाते. सद्यस्थितीत शहरामध्ये सर्वेक्षणाचा पहिला टप्पा सुरू आहे.
करोनापासून संरक्षणासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपआपल्या स्तरावर अंमलात आणाव्यात याची माहितीही या वेळी शहरवासियांना देण्यात येत आहे. शनिवारी महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत 20 लाख 65 हजार जणांची तपासणी झाली आहे. त्यामध्ये 1733 व्यक्तींच्या घशातील द्रावाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 399 व्यक्तींचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.