पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा – अजित पवार

  • राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांना अजित पवारांच्या सूचना
  • ढेपाळलेली संघटना “ऍक्‍टीव्ह’ करा; महापालिकेतील भ्रष्टाचारावरही सूचक भाष्य

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये होत आहे. सध्या संघटना ढेपाळली असून, ती ऍक्‍टीव्ह करणे गरजेचे आहे. मागील चुका टाळून कामाला लागा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. विशेष म्हणजे या वेळी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरही सूचक भाष्य करत आपण लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचाही संदेश दिला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक आज (रविवारी) चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, महापालिकेवर आपली अनेक वर्षे सत्ता होती. सत्तेचा फायदा सर्वसामान्य जनतेसाठी करतानाच शहरात विकासकामे करण्यात आपल्याला यश आले. मात्र मोदी लाट आणि विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे आपणाला पराभव पत्करावा लागला. राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे त्यांनी प्रभाग रचनेमध्येही अनेक बदल केले. सत्तेचा गैरवापर आपण कधीच केला नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी सत्ताकाळात काय प्रकार केले हे सर्वांना माहिती आहे. सध्या महापालिकेत बहुमताच्या जोरावर काहीही करण्याचे प्रकार सुरू आहेत. सध्या आचारसंहिता असल्यामुळे काही बोलणे उचित ठरणार नाही.

मात्र, आचारसंहिता संपताच आयुक्तांना “मी माझ्या भाषेत सांगेन’ असेही अजित पवार म्हणाले. यापुढे दर आठवड्याला पुन्हा पुण्यात असणार असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विकासासाठी आणि जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम यापुढे आपण करणार असून गहाळ न राहता 2022 च्या तयारीला लागा. येत्या काही दिवसांत नवी टीम आणि अनुभवी सहकाऱ्यांना संधी देताना पक्षसंघटनेतही काही अपेक्षित बदल करू असे सांगतानाच अंग झटकून कामाला लागण्याच्या सूचनाही पवार यांनी या वेळी दिल्या.

पदवीधरांचे प्रश्‍न तात्काळ सोडवू
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून पदवीधरची निवडणूकही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जात आहे. पदवीधरमधून अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून आसनगावकर यांना विजयी केल्यास पदवीधर व शिक्षकांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लावू असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. पुणे जिल्ह्यात विशेषत: हवेली तालुक्‍यात पदवीधरचे सर्वाधिक मतदार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे. प्रत्येक पन्नास मतदारांच्या पाठीमागे एक कार्यकर्ता असे नियोजन करून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.

कायदा सुव्यवस्था महत्त्वाची
पिंपरी-चिंचवडमध्ये अधून मधून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वाहने जाळणे, तलवारी घेऊन फिरणे, दहशत माजविणे असे प्रकार समोर येत आहेत. पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करताना आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. गुंडगिरी मोडीत काढताना त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्णय घ्यायला हवेत, असेही पवार म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.