पिंपरी ,- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगर येथे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय उभारण्यात आले आहे. या प्राणी संग्रहालयामुळे नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांची ओळख होण्यास मदत होणार आहे. परंतु हे प्राणिसंग्रहालय मागील काही वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी आहे. प्राणिसंग्राहलय पाहण्यासाठी येणारे नागरिक अक्षरशः प्रश्न करत आहेत की आयुक्तसाहेब हे संग्रहालय कधी सुरू होणार आहे.
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जात आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जात आहे. प्राणिसंग्रहालयात सध्या पाचशेच्या आसपास प्राणी आहेत. संभाजीनगर येथे निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी प्राणिसंग्रहालयाचे 1989 मध्ये सुरु केले होते. हे संग्रहालय सात एकरमध्ये आहे.
विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने 25 डिसेंबर 2017 पासून प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. साधारण सात वर्षांपासून या संग्राहलयाचे विसतारीकरणाचे काम सुरू आहे. परंतु काम संपण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांना प्रश्न पडत आहे की हे संग्रहालय कधी सुरू होणार. संथगतीने सुरू असलेले काम लवकरात लवकर उरकून प्राणिसंग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.