- आयुक्तांचा अंदाज ठरतोय खरा – नवीन 1048 रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरामध्ये ऑगस्ट महिन्याअखेर करोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे शहराची करोनाबाधित रुग्णांच्या बाबातीत 50 हजारीकडे वाटचाल सुरू आहे. आजपर्यंत शहरात 46516 जणांना करोनाची लागण झाली आहे.द सध्याचा करोनावाढीचा वेग पाहता पुढच्या चार दिवसांमध्ये करोना पन्नास हजारांचा आकडा ओलांडेल.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शुक्रवारी चार वाजेपर्यंत शहरात 1048 रुग्णांची नोंद झाली. शहरातील 1006 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 42 जणांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 2 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 46516 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 6414 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 770 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शुक्रवारी दिवसभरात शहरात 7 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील दिघी, भोसरी येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील शिंगोली, देहूगाव, मुळशी, तळेगाव, आळंदी येथील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज दिवसभरात 246 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 32109 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4314 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 2495 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.